मुंबई - धो धो पाऊस कोसळतोय. त्यानिमित्त खास केलेल्या कुरकुरीत भज्यांचा आस्वाद घेत पावसाळी चिंब वातावरणाचा आनंद घेणे कोणालाही आवडेल. पावसाळा सुरू झाल्याचा माहोल लक्षात घेऊन मुंबईतील दादर विभागात येत्या २४ जूनला दादर सांस्कृतिक मंचातर्फे आगळ्यावेगळ्या भजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात अशा प्रकारचा भजी महोत्सव पहिल्यांदाच होत असून त्यात व्हेज व नॉनव्हेजमधील सुमारे ३० प्रकारच्या भज्यांचा खवय्यांना आस्वाद घेता येणार आहे.
कांदा व बटाटा भजी इतकेच प्रकार अनेकांना माहिती असतात. पण मराठी खाद्यसंस्कृतीत अनेक प्रकारची भजी केली जातात याची माहितीही या महोत्सवातून मिळणार आहे. दादर सांस्कृतिक मंचाचे अमेय मोने म्हणाले, भजी महोत्सवाचे आयोजन आम्ही मुंबईतील दादर विभागातील नागरिकांपुरतेच केले आहे. दादर पश्चिम येथील अँटोनिया डिसिल्वा टेक्निकल स्कूलच्या परिसरात २४ जून रोजी सायंकाळी ५ ते ९ या वेळात हा महोत्सव होणार असल्याची माहिती मोने यांनी दिली.
३० प्रकारची भजी
व्हेजिटेरियन प्रकारातील भजी : बटाटा भजी, कांदा भजी, वांग भजी, सुरण भजी, टोमॅटो भजी, मिरची भजी, पालक भजी, मूगडाळ भजी, चणाडाळ भजी, पनीर भजी, माठाच्या पानाची भजी, मंचुरियन भजी, केळ्याची भजी, कॉर्न भजी, मिक्स व्हेज भजी, सोयाबीन भजी, भेंडी भजी, चीज भजी आणि नॉनव्हेज भजींचा समावेश आहे.