आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉटेलमध्‍ये छापा टाकून जाेडप्यांवर कारवाईप्रकरणी मुख्यमंत्र्यांना उच्च न्यायालयाची नोटीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मालवणी परिसरातील अक्सा, मढ, दानापानी या हॉटेलवर छापा टाकून तेरा जोडप्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईप्रकरणी उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गृहखाते, मुंबई पोलिस आयुक्त, समाजसेवा शाखा, स्थानिक उपायुक्त आणि मालवणीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना नोटीस बजावली अाहे.
सुमेर सभरवाल यांच्या जनहित याचिकेवर गुरुवारी न्यायालयाने या सर्वांना ३ सप्टेंबरपर्यंत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. ही कारवाई करताना पोलिसांनी व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला असून ही बाब लक्षात आल्यानेच दोषी पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिले आहेत. मात्र, पोलिस विभागामार्फतच ही चौकशी होणार असल्याने ती कितपत निष्पक्षपातीपणे होईल याबद्दल याचिकाकर्त्यांनी शंका व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी न्यायालयाने स्वत:च्या देखरेखीखाली एक समिती नेमावी तसेच कारवाई करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. अाता पुढील सुनावणी ३ सप्टेंबरला होणार आहे.
पाेलिस अाणखी अडचणीत
मढ परिसरातील हॉटेलची ६ ऑगस्टला अचानक तपासणी करत पोलिसांनी तेरा युगुलांविरोधात दंडात्मक कारवाई केली होती. मात्र, नंतर कारवाईबाबत सर्वच स्तरातून टीकेचा सूर उमटू लागल्यानंतर पोलिस आयुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. तसेच यापुढे अशा पद्धतीची कोणतीही कारवाई करू नये, अशा पद्धतीचे अंतर्गत आदेशही पोलिसांना दिले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याच्या मानवी हक्क आयोगानेही पोलिसांकडून खुलासा मागवला आहे.