आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसामुळे लालबागच्या राजाचे उत्पन्न घटले; दोन कोटी रुपयांची घट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाच्या उत्पन्नात यंदा पावसाने खो घातल्याने गेल्या वर्षीपेक्षा दोन कोटींनी घट आली. २९ ऑगस्ट रोजी मुंबईत    प्रलयकारी पाऊस झाला. त्यामुळे भाविकांची संख्याही घडली त्याचा दानावर परिणाम झाला. लालबाग राजा मंडळाला यंदा सात कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षी नऊ कोटी रुपयांची कमाई या मंडळाने केली होती.
 
राजाच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या भेटवस्तूंच्या लिलावाला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण ८४ लहान-मोठ्या अलंकारांचा लिलाव करण्यात आला. या लिलावात सोन्याच्या बिस्किटांना सर्वाधिक म्हणजे ३१ लाख १८ हजारांची किंमत मिळाली तर सोन्याच्या गणेशमूर्तीला १४ लाख ५० हजार रुपये एका भक्ताने मोजले. लिलावातून मंडळाला एकूण ९८.४८ लाख रुपये मिळाले. मंडळाने केलेल्या लिलावात एक किलो वजनाच्या सोन्याच्या विविध वस्तूंना ३१.३५ लाख रुपये मिळाले, तर गणेशाच्या ५८७ ग्रॅम वजनाच्या मूर्तीसाठी १५.६० लाख रुपये एका भक्ताने मोजले. सोन्याच्या नेकलेससाठी १.५ ते २.६ लाख रुपये मिळाले. गेल्या वर्षी ६.६ कोटी रोखीमध्ये आणि लिलावातून २.२ कोटी मिळाले होते.  

निरीक्षकांना हाकलले  
लालबागच्या राजाला मिळणाऱ्या देणगीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्यानंतर धर्मादाय आयुक्तांनी देणगीची मोजदाद करताना दोन निरीक्षकांना देखरेखीसाठी पाठवले होते. लिलावाच्या वेळीही दोन निरीक्षक उपस्थित होते. परंतु, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दादागिरी करत दोन्ही निरीक्षकांना त्यांच्या देखरेखीखाली लिलाव न करण्याचा निर्णय घेत त्यांना बाहेर पाठवले. अखेर दोन्ही निरीक्षकांनी भाविकांमध्ये बसून लिलावावर लक्ष ठेवले. धर्मादाय आयुक्तांनी उत्पन्नाची तपासणी करण्याबाबत काढलेल्या आदेशाला मंडळातर्फे पुढील आठवड्यात न्यायालयात आव्हान दिले जाणार असल्याची माहितीही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
बातम्या आणखी आहेत...