आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीत मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली; जालन्यातील डॉ. ताहेर यांचा पुढाकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बृहन्महाराष्ट्रातील ज्या विद्यापीठांत मराठी विभाग आहेत तिथे पुरेसे विद्यार्थी नसल्याने त्या विभागांचे भविष्य धूसर झालेले असतानाच दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेशातील अलिगड मुस्लिम विद्यापीठ, काशी हिंदू विश्वविद्यालयात मराठी विभागात विद्यार्थ्यांची संख्या मात्र वाढत आहे. यामुळेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी मराठी शिकवण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.  

अलिगड मुस्लिम विद्यापीठामध्ये आधुनिक भारतीय भाषा विभाग आहे. त्यात विविध भारतीय भाषांबरोबर मराठीही शिकवली जाते. या विद्यापीठात १९८० ते २०१५ या कालावधीत मराठी विषयात डिप्लोमा, बीए, एमए अशा अभ्यासक्रमांसाठी १० विद्यार्थीही नव्हते.  मात्र मूळ जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रहिवासी असलेल्या डॉ. ताहेर पठाण यांनी २०१५ मध्ये या विद्यापीठामध्ये मराठी विषयाचे सहायक प्राध्यापक म्हणून सूत्रे स्वीकारली. मराठी विषय शिकवणारे ते या विद्यापीठातील एकमेव प्राध्यापक आहेत. पठाण यांनी केलेल्या प्रयत्नांनंतर या विभागातील विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.  

डॉ. ताहेर पठाण म्हणाले, अलिगड मुस्लिम विद्यापीठात मराठी विषयाचे एक- एक वर्षाचे प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम चालवले जातात. २०१५ पासून त्या दोन्ही अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७० ते ८० पर्यंत गेली. महाराष्ट्र हे प्रगत राज्य असल्याने तिथे नोकरी मिळविण्यासाठी मराठी भाषा मिळणे आवश्यक आहे, असे वाटल्याने २०१५ मध्ये इंजिनिअरिंगच्या मुलांनी मराठी सर्टिफिकेट कोर्समध्ये प्रवेश घेतला. मराठीच्या अभ्यासक्रमांना विद्यार्थी मिळावेत यासाठी विभागातर्फे आम्ही विशेष पत्रके काढली तसेच व्हॉट्सअॅप्सच्या माध्यमातूनही मराठी विभागाचा प्रचार केला.  त्याचा अनुकूल परिणाम म्हणून आमच्या मराठी विषयाला वाढीव संख्येने विद्यार्थी मिळू लागले. मराठी विषयातून बीए, एमए करायची सोय असूनही तेवढे विद्यार्थी अलिगड मुस्लिम विद्यापीठात प्रवेश घेत नाहीत, असेही पठाण यांनी सांगितले.  

उत्तर प्रदेशातील काशी हिंदू विद्यापीठात १९३२ पासून मराठी भाषेचे अध्यापन केले जाते. १९८२ मध्ये स्वतंत्र मराठी भाषा विभाग स्थापन झाला. संपूर्ण उत्तर भारतातील विद्यापीठांत फक्त काशी हिंदू विद्यापीठातच स्वतंत्र मराठी विभाग आहे. या विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून प्रा. प्रमोद पडवळ व  सहायक प्राध्यापक म्हणून प्रा. नामदेव गपाटे हे कार्यरत आहेत.

मराठीला विद्यार्थी मिळतातच : प्रा  पडवळ
मूळचे पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील रहिवासी असलेल्या प्रा. प्रमोद पडवळ म्हणाले, आमच्या विभागात अंडरग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स चालतात. त्यात दरवर्षी शंभर विद्यार्थी मराठी शिकतात. बीए अभ्यासक्रमात पर्यायी विषय म्हणून मराठी भाषा शिकणारे ५० ते ६० विद्यार्थी दरवर्षी असतात. असे एकूण १६० तरी विद्यार्थी मराठी भाषेचे अध्यापन काशी हिंदू विश्वविद्यालयातून करतात. आमच्याकडे मराठी विषयाला विद्यार्थी मिळाले नाहीत अशी स्थिती अजून एकदाही निर्माण झालेली नाही. उलट ही संख्या वाढतेच आहे.
बातम्या आणखी आहेत...