आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात खरीप पीक कर्जाचा टक्का घसरला, केवळ 35 टक्के वाटप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चालू खरीप हंगामासाठी ४० हजार कोटी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. मात्र, हंगाम संपत आला असतानाही आतापर्यंत केवळ १४ हजार कोटी म्हणजेच उद्दिष्टाच्या ३५ टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. कर्जवाटपाचा टक्का घसरण्यामागे कर्जमाफी व थकबाकीचा परिणाम असल्याचे बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.   
 
खरिपाच्या पीक कर्ज वाटपाची मुदत सप्टेंबरपर्यंत असली तरी हंगाम संपत आल्याने यापुढे पीक कर्जाचा आकडा वाढण्याची शक्यता नाही. मागच्या रब्बी हंगामात ३७ हजार कोटी कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. मुदतअखेर २७ हजार कोटींचे पीक कर्ज वाटण्यास व्यापारी, ग्रामीण व सहकारी बँका यशस्वी ठरल्या होत्या.   
 
खरीप हंगामाच्या तोंडावर राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर (पीक कर्जमाफी) केली. त्यामुळे पीक कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांनी नवे कर्ज घेण्यापेक्षा कर्जमाफीचे अर्ज भरण्याला प्राधान्य दिले आहे. परिणामी बँका नेटाने प्रयत्न करूनही आजपर्यंत केवळ १४ हजार २५ कोटी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्टच गाठू शकल्या. राज्यात ३७ लाख ३० हजार थकबाकीदार शेतकरी आहेत. असे असतानाही पीक कर्जाला शेतकऱ्यांनी थंडा प्रतिसाद दिल्यामुळे बँकाही चक्रावल्या आहेत. कर्जमाफी योजनेत अपात्र होण्याच्या भीतीने थकबाकीदार शेतकऱ्यांनी इतर मार्गांनी पेरणीसाठी पैसे उभे केले. त्यामुळे नवे कर्ज काढणे त्यांनी टाळल्याचे सहकारी क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.   
 
खरिपाच्या तोंडावर कर्जमाफीचा निर्णय झाला, त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास तांत्रिक अडचणी उद्भवल्या होत्या. म्हणून सरकारने तातडीने १० हजार रुपये  उचलकर्ज योजना आणली. त्या योजनेसही शेतकऱ्यांनी थंडा प्रतिसाद दिला. १० हजारांच्या कर्जासाठी बँकांकडे राज्यातून केवळ ४३ हजार अर्ज प्राप्त झाले. त्यातील ३४ हजार ४१० शेतकऱ्यांना मागच्या ४० दिवसांत २४ कोटी ८ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.    
 
बातम्या आणखी आहेत...