आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या खात्यात निवास, भाेजन भत्ता, वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्यांसाठी स्वाधार योजना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अकरावी, बारावी आणि त्यानंतर व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार अाहे. यासाठी राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेला मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.  

या योजनेची अंमलबजावणी २०१६-१७  या आर्थिक वर्षापासून केली जाणार आहे. तिचा लाभ जिल्हानिहाय गुणवत्ता यादीनुसार सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांना होणार असून त्यासाठी शासन दरवर्षी १२१ कोटी इतका खर्च करणार आहे. विद्यार्थ्यांना दिली जाणारी ४३ हजार ते ६० हजार इतकी वार्षिक रक्कम आधार क्रमांकाशी संलग्न बँक खात्यांमध्ये डीबीडी पोर्टलमार्फत थेट वितरित करण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ४४ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहेत. राज्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी ४४१ शासकीय वसतिगृहे असून त्यापैकी २३४  मुलांची आणि २०७ मुलींची आहेत. मुलांच्या वसतिगृहाची प्रवेश क्षमता २१ हजार ६६० आणि मुलींची प्रवेश क्षमता १९ हजार ८६० अाहे.   
 
राज्यात व्यावसायिक, बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या वाढती असून तेथे प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. शासकीय वसतिगृहांच्या प्रवेशासाठी २०१५-१६ मध्ये ४५ हजार ८४९ विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. त्यापैकी ११ वी व १२ वीमध्ये प्रवेश घेतलेल्या १८ हजार ५७८ विद्यार्थ्यांच्या अर्जांपैकी ६ हजार ६९४ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. तसेच बारावीनंतरच्या अभ्यासक्रमांस ७ हजार ९०७ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. या वर्षी (२०१६-१७) मध्ये ४४ हजार ३०२ अर्ज प्राप्त झालेले असून त्यापैकी १७ हजार विद्यार्थ्यांनाच प्रवेश देणे शक्य होणार आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागू नये यासाठी मंत्रिमंडळाने त्यांना अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला अाहे. 
 
अाॅनलाइन अर्जाची अट
या याेजनेसाठी विद्यार्थ्याला समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांकडे ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास दहावीत किमान ६० टक्के गुण असणे आवश्यक आहे. तसेच १२ वीमध्ये किमान ६० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यालाच पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी या योजनेचा लाभ मिळेल. हा लाभ एकूण शैक्षणिक कालावधीत कमाल सात वर्षांसाठी मिळेल. या योजनेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तीन टक्के आरक्षण असून त्यांना किमान टक्केवारीची मर्यादा ५० टक्के असेल. त्यांच्यासाठी स्वतंत्र गुणवत्ता यादी केली जाईल.

२५ हजार विद्यार्थ्यांना लाभ  
सन २०१७-१८  या शैक्षणिक वर्षापासून शासकीय वसतिगृहात प्रवेश घेणे किंवा स्वाधार योजनेचा लाभ घेणे हे दोन पर्याय विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असतील. मात्र चालू वर्षी सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांना, तर पुढील वर्षी १० हजाराची संभाव्य वाढ गृहीत धरून सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.  
बातम्या आणखी आहेत...