आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रवासी सेवा शुल्कवाढीचा भार; विमान प्रवास महागण्याची शक्यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सर्वसामान्यांना स्वस्तात हवाई सफर घडवण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी ‘उडान’ योजना जाहीर केली. दुसरीकडे विमानतळाचा सुरक्षा खर्च भागवण्यासाठी अाता प्रवासी सेवा शुल्कात किमान ३८ टक्क्यांनी वाढ करण्याचा विचार केला जात अाहे. तसे झाल्यास वाढीव विमानभाड्याची झळ प्रवाशांना सहन करावी लागेल.  


देशभरातल्या विमानतळांना सुरक्षा पुरवण्यासाठी १,३०० कोटी रुपये खर्च हाेत अाहेत. या शुल्काच्या माध्यमातून गोळा झालेल्या निधीमध्ये सध्या ५०० कोटींची तूट जाणवत अाहे. ही तूट देशाच्या एकत्रित निधीच्या (कॉन्सॉलिडेटेड फंड ) माध्यमातून देण्यात येईल आणि त्यासाठी प्रवासी सेवा शुल्क वाढवण्याची गरज भासणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले होते. परंतु अाता हा फंड देण्यास वित्त मंत्रालयाने साफ नकार दिला. त्यामुळे आता या प्रवासी शुल्कात किमान ३८ टक्क्यांनी वाढ करण्याशिवाय सरकारला पर्याय दिसत नाही.  


केंद्रीय औद्योगिक सुरक्षा रक्षक महामंडळाचे कर्मचारी, अधिकारी यांचे पगार चुकते करण्यासाठी विमानतळ सुरक्षेचा खर्च प्रवाशांच्या खिशातून काढणे चुकीचे आहे. सीआयएसएफची जबाबदारी सरकारचीच आहे. सेवा शुल्क आकारण्यासाठी सरकारने विशिष्ट रक्कम निश्चित करणे गरजेचे आहे. अन्यथा प्रवाशांना भाडेवाढ सहन करावी लागेल, अशी भीती हवाई वाहतूक तज्ञ उज्ज्वल ठेंगडी यांनी व्यक्त केली.  


एमआरओ असोसिएशन आॅफ इंडियाचे संस्थापक महासचिव पुलक सेन म्हणाले की, ‘देशातल्या विमानतळांवर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा रक्षक महामंडळाची सुरक्षा व्यवस्था पुरवली जाते. त्यांचा पगार सरकारला द्यावा लागतो. यासाठी लागणारा निधी कमी पडत असल्यामुळे सरकारने प्रवासी सेवा शुल्कात वाढ करण्याचा विचार केला आहे. प्रत्येक तिकिटामागे ५० रुपये वाढणार असतील तर त्यामुळे फारसा फरक पडणार नाही. परंतु विमानतळ सुरक्षा खर्च भागवण्यासाठी सरकारच्या कोशात पुरेसा निधी आल्यास त्याचा विमान प्रवाशांवर ताण येणार नाही.’  

 

तिकिटामागे ५० रुपये वाढ हाेऊ शकते  
विमान तिकिटाचे आरक्षण करतेवेळी प्रत्येक तिकिटावर १३० रुपये प्रवासी सेवा शुल्क आकारण्यात येते. या शुल्कात आता प्रति तिकीट ५० रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हे प्रवासी शुल्क १८० रुपये हाेऊ शकते.  

 

प्रवासी सेवा शुल्क कशासाठी ? 
प्रवासी सेवा शुल्क हे विमानाचे तिकीट आरक्षित करतेवेळी भरावे लागते. संकलित करण्यात आलेल्या या शुल्कातून विमानतळ सुरक्षा खर्च भागवणे अधिकाऱ्यांना शक्य होते. त्याचप्रमाणे विमानतळाची सुरक्षा व्यवस्था बघणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा रक्षक महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगारही यातून दिला जातो.

बातम्या आणखी आहेत...