आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई: रेल्वे भाडेवाढीविरुद्ध भाजपही सरसावला, उद्धव यांचीही विनंती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रेल्वे भाडेवाढीविरुद्ध विरोधी पक्षांत तीव्र नाराजी असताना प्रदेश भाजपही याविरोधात सरसावला आहे. मुंबईतील लोकलपुरता तरी फेरविचार व्हावा, अशी विनंती प्रदेश भाजपने केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे केली आहे. मुंबईसाठी आधी रेल्वे विकास आराखडा तयार करा, मगच भाडेवाढ करा, असे भाजपच्या शिष्टमंडळाने म्हटले आहे. हा दिलासा न दिल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला फटका बसेल, असा इशारा राज्यातील नेत्यांनी दिला आहे.
भाडेवाढीमुळे मुंबईत लोकल प्रवासाच्या खर्चात दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली. यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राजनाथ यांची मुंबईत भेट घेतली.

मुंबईची रेल्वे सेवा अमुलाग्र सुधारण्यासाठी असलेला विकास आराखडा तयार करून तो लोकांसमोर मांडावा. मगच लोकलच्या भाडेवाढीचा निर्णय घ्यावा, असेही शिष्टमंडळाने सुचवले. मुंबैकरांच्या भावना पंतप्रधान आणि रेल्वेमंत्र्यांपर्यंत पोहोचवू, असे आश्वासन राजनाथ यांनी दिल्याचे फडणवीस म्हणाले.

विधानसभेची चिंता : आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबई आणि उपनगरात तसेच ठाणे आणि नव्याने तयार झालेला पालघर जिल्हा क्षेत्रांत एकूण साठ जागा आहेत. याच भागात लोकलचे विस्तृत जाळे असून ही नाराजी मतदानात उमटली तर अडचण होऊ शकते, याकडे शिष्टमंडळाने राजनाथ यांचे लक्ष वेधले.

उद्धव यांचीही विनंती
रेल्वे भाडेवाढ धक्कादायक असल्याची भावना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही व्यक्त केली आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही ठाकरे यांनी म्हटले आहे. भाडेबाढ मागे घेता येत नसेल तर किमान कमी करा, अशी विनंती आपण पंतप्रधानांना करणार असल्याचेही ते म्हणाले.

काँग्रेसचे मंत्री, आमदार करणार विनातिकीट प्रवास
भाडेवाढीविरुद्ध प्रदेश काँग्रेसतर्फे सोमवारी सविनय कायदेभंग आंदोलन होणार आहे. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह काही मंत्री, आमदार व पदाधिकारी मुंबई-ठाणे विनातिकीट प्रवास करणार आहेत. तसेच 25 रोजी प्रमुख स्थानकांवर आंदोलन होईल.