आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या इशाऱ्यामुळे सरकारने बाबासाहेबांचे चरित्र प्रकाशन रोखले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीने गेली ३ वर्षे मेहनत घेऊन तयार केलेल्या बाबासाहेबांच्या चित्रमय चरित्राचा (फोटोबायोग्राफी) प्रकाशन समारंभ बाबासाहेबांचे नातू अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या इशाऱ्यामुळे सरकारला एेनवेळी रद्द करावा लागला. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनी या २२ व्या खंडाचे प्रकाशन होणार होते, मात्र आता हा प्रकाशन समारंभ  हिवाळी अधिवेशनात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.   


६ डिसेंबर हा बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन “शोक दिवस’ म्हणून पाळला जातो. याच दिवशी बाबरी मशीद पाडण्यात आली. हा दिवस भाजप आनंदाचा दिवस म्हणून उभा करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे या दिवशी बाबासाहेबांच्या फोटोबायोग्राफीचे प्रकाशन होणे उचित होणार नाही, असे भारिप अध्यक्ष अॅड. बाळासाहेब ऊर्फ प्रकाश आंबेडकर यांनी गुजरातमधील मेहसाणा येथून फोनवर ‘दिव्य मराठी’ला सांगितले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीवर बाळासाहेब आंबेडकरदेखील आहेत. फोटोबायोग्राफीचा प्रकाशन सोहळा चैत्यभूमीवर घेण्याचे प्रकाशन समितीचे नियाेजन होते. शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि राज्यपालांची त्यासाठी वेळही घेण्यात आली होती. मात्र, बाळासाहेब आंबेडकर यांच्या अनपेक्षित विरोधामुळे प्रकाशन समितीला हा समारंभ ऐनवेळी पुढे ढकलावा लागला आहे. चरित्र साधने आणि प्रकाशन समितीने १९७८ पासून बाबासाहेबांचे लेखन आणि भाषणे या मालिकेत २१ खंड प्रकाशित केले आहेत. 

 

दुर्मिळ खजिना?  
४०० पृष्ठांच्या सुधारित फोटोबायोग्राफीत ४०० छायाचित्रे आहेत. बाबासाहेबांच्या स्वहस्ताक्षरातील २२ प्रतिज्ञा, राज्यघटना मसुदा समितीतील २९६ सदस्यांच्या स्वाक्षऱ्या, बाबासाहेबांनी लिहिलेल्या ग्रंथाची मुखपृष्ठे, पाक्षिकांचे पहिले अंक, त्यांच्या गुरुजनांची छायाचित्रे, बाबासाहेबांना अस्पृश्यतेचा पहिला अनुभव देणारे साताऱ्याजवळचे मसूर रेल्वेस्टेशन इत्यादी दुर्मिळ छायाचित्रांचा खजिना या नव्या ग्रंथात असल्याची माहिती समितीचे सदस्य सचिव प्रा. अविनाश डोळस यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...