आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफी अर्ज भरण्यास आठवड्याची मुदत; शेतीची कामे साेडून बळीराजा पुन्‍हा रांगेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-  छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना अर्थात शेतकऱ्यांसाठी जाहीर कर्जमाफी योजनेचे अर्ज भरण्याची शुक्रवार (१५ सप्टेंबर) ही शेवटची तारीख सरकारने जाहीर केल्यानंतर अर्ज भरण्यासाठी केवळ एकच दिवस शिल्लक राहिल्याने गुरुवारी अर्ज दाखल न केलेल्या शेतकऱ्यांनी पहाटेपासूनच शहर व गाव परिसरातील सेतू सुविधा केंद्रे तसेच बँका व अापले सरकार या अर्ज भरणा केंद्रांवर गर्दी केली. त्यामुळे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील हजारो शेतकरी गुरुवारी कर्जमाफी अर्ज भरण्याच्या मोहिमेवर दिसून आले. बरेच शेतकरी विविध तांत्रिक अडचणींमुळे अर्ज भरू शकले नाहीत. दरम्यान, गुरुवारी रात्री उशिरा राज्य सरकारने कर्जमाफी अर्जांसाठी २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांना अर्ज दाखल करण्यासाठी अजून एक आठवडा मिळाला आहे. 
 
औरंगाबाद, जालना : शेतकऱ्यांची कसरत
औररंगाबाद जिल्ह्यात ऑनलाइन अर्ज भरताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागली. जिल्ह्यात ७० टक्के अर्ज भरले गेले. सर्व्हर डाऊन होणे, थंब इंप्रेशन न जुळणे, आधार कार्ड लिंक नसणे, लोडशेडिंग अशा अनंत संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागले.   जालना  जिल्ह्यात ३ लाख ५९ हजार ८७५  लाभार्थी शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यात १ लाख ७८ हजार २२६ लाभार्थी कुटुंबांची नोंदणी झाल्याचे जिल्हा उपनिबंधकांनी सांगितले. 
 
बीड:  अडचणींचा सामना करत महिलाही उभ्या राहिल्या रांगेत
जिल्ह्यातील अकरा तालुक्यांत १४ सप्टेंबरअखेर रात्री आठ वाजेपर्यंत चार लाख ७० हजार ९९० शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या अर्जाची नोंदणी केली. वडवणी येथे कर्जमाफी अर्ज भरण्यासाठी शेतकरी, त्यांच्या  पत्नीलाही सेतु सुविधा केंद्राच्या रांगेत उभे रहावे लागले.   गेवराई तालुक्यातील विविध सेतू केंद्रावर कर्जमाफी साठी अर्ज भरताना शेतकऱ्यांना अडचणी आल्या.  २० टक्के  शेतकऱ्यांना गुरुवारी ऑनलाइन अर्ज भरता आले नाहीत. पाटोदा येथे ई सुविधा केंद्र , आपले सरकार या केंद्रावर  इंटरनेट  सुरळीत असल्याने  शेतकऱ्यांना अडचणी  आल्या नाहीत. परंतु अंगठ्याचा ठसा घेताना तो उमटतच नसल्याने अनेक शेतकऱ्यांना  ऑफलाइन अर्ज भरावे लागले.
 
हिंगोली : कर्जमाफी अर्ज दाखल करण्यासाठी बँक, केंद्रांवर गर्दी  
कर्जमाफीबाबतचे ऑनलाईन अर्ज भरण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस असल्याने बँका आणि सुविधा केंद्रांवर मोठी गर्दी दिसून आली. येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्वच शाखांमध्ये आणि इतर बँकांसमोरही शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच सुविधा केंद्रांवर अर्ज भरण्यासाठीही रांगा दिसून आल्या. इंटरनेट सेवा सुरळीत चालू असली तरी अधूनमधून वीज पुरवठा खंडित होत असल्याने अर्ज भरण्यात मोठा अडसर निर्माण झाला होता. गेल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात केवळ ३२ हजार शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते. तर कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात सव्वा लाखावर आहे. त्यामुळे उर्वरित शेतकरी अर्ज भरण्यासाठी गर्दी करतील हे नक्की. 
 
नांदेड : ई सेवा केंद्रे २४ तास सुरू ठेवण्याचे दिले होते आदेश
जिल्ह्यातील महा ई-सेवा, आपले सरकार, सीएससी केंद्र  दोन दिवस २४ तास सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले होते. त्यामुळे आज दिवसभर हजारो शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले.  जिल्ह्यामध्ये आजपर्यंत २ लाख ५९ हजार २५९ शेतकरी कुटुंबांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुका, विभाग, जिल्हा पातळीवर समित्या गठीत केलेल्या आहेत. या समित्या शेतकऱ्यांना कर्जमाफी अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन करीत आहेत. 
 
उस्मानाबाद : अर्जासाठी शेवटच्या दिवसापर्यंत गोंधळ  
अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत तांत्रिक अडचण  व अनेक अडचणींमुळे गोंधळाचेच वातावरण कायम होते. गुरुवारीही शहर व जिल्ह्यात हीच परिस्थिती होती.   गुरुवारी सीआयसी केंद्रासमोर सकाळी ७ वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत गर्दीच दिसून येत होती. त्यातच एखाद्याचा अंगठा जुळत नसल्याने पुन्हा आधार लिंकिंग करणे,  कर्जखाते, सेव्हिंग खाते क्रमांक आणणे अशा विविध अडचणीतून कसाबसा मार्ग काढत जिल्ह्यातील १ लाख १० हजार ८९५ शेतकऱ्यांनी  अर्ज दाखल केले आहेत. 
 
परभणी : आजवर २ लाख ८७ हजार अर्जांची नोंदणी  
परभणी जिल्ह्यात गुरुवारपर्यंत  २ लाख ८७ हजार अर्जांची ऑनलाइन नोंदणी झाली असून अखेरच्या दिवशीही (दि.१५) नोंदणी करणे सुलभ होण्याच्या दृष्टीने प्रशासनाने तहसील व उपविभागीय कार्यालयात मदत कक्ष स्थापन केले आहेत.  महा-ई सेवा केंद्र, सीएससी केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरले गेले. यात अनेक अडचणी सातत्याने आल्या. तरी देखील जिल्ह्यात ऑनलाइन अर्जांची नोंदणी चांगल्या प्रमाणात झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंक, सर्व राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बॅंकांनीही अर्ज दाखल करून घेतले.
 
लातूर : केंद्रांवर सारे काही अलबेल, आरामात भरले अर्ज
कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी लातूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता ‘आपले सरकार’ व ई-महासेवा केंद्र याद्वारे मोफत अर्ज भरण्याची सुविधा लातूर जिल्ह्यातील ८८६ केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यातील बहुतांश अर्ज याअगोदरच भरण्यात आले आहेत. त्यामुळे गुरुवारी या केंद्रावर किंवा तहसील कार्यालयातील ई-महासेवा केंद्रावर फारशी गर्दी आढळून आली नाही.   शांततेत आणि सुरळीतपणे शेतकऱ्यांना अर्ज भरता आले.
बातम्या आणखी आहेत...