आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

6 शस्त्रक्रिया, टीबी; देविकाच्या कुटुंबीयांची परवड सुरूच; कसाबविरुद्ध साक्ष देणा-या देविकाची कहाणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दहशतवादी कसाबच्या विरोधात साक्ष देणारी आणि त्याला फाशीची शिक्षा मिळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार देविका रोटावान. तिची कथा धैर्य आणि संघर्षाची आहे. ही कथा अपूर्ण सरकारी दावे आणि लोकांच्या संवेदनहीनतेची आहे. दहशतवाद्यांची गोळी लागल्याने सहा शस्त्रक्रिया झालेल्या देविकाला गेल्या वर्षभरापासून क्षयामुळे (टीबी) आजारी आहे. जवळचे नातेवाईक या कुटुंबाचे नाव लग्नपत्रिकेत छापत नाहीत आणि त्यांना निमंत्रणही देत नाहीत. कारण दहशतवाद्यांना माहीत झाले तर विनाकारण अडचणीत येऊ, ही भीती.

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी देविका ९ वर्षांची होती. आता ती १८ वर्षांची झाली आहे. मुंबईच्या बांद्रा पूर्वमधील सुभाषनगरमध्ये ‘दिव्य मराठी’ च्या प्रतिनिधीने देविकाची भेट घेतली. अरुंद गल्लीत एकमेकांना लागून असलेल्या अनेक लहान घरांमध्ये देविकाचेही एक घर आहे. ८ बाय १२ आकाराचे. वडील नटवरलाल यांनी देविका आणि तिचा भाऊ जयेश यांची भेट घालून दिली. देविकाच्या आईचे २००६ मध्येच निधन झाले आहे. हे कुटुंब मूळ राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील सुमेरपूर येथील, पण ३० वर्षांपूर्वी मुंबईला आले होते. नटवरलाल यांचा केशर आणि ड्राय फ्रूट्सचा मोठा व्यवसाय होता. दहशतवादी हल्ल्यानंतर ते मुलीची काळजी घेऊ लागले आणि तिकडे सर्व व्यवसाय बुडाला. व्यापाऱ्यांनी पैसे बुडवले. आता देविकाचा सर्वात मोठा भाऊ पुण्यात किराणा दुकानात काम करतो.


देविकाला तब्बल २२ पुरस्कार मिळाले आहेत. २६/११ च्या स्मृतिदिनी अनेक समारंभात अनेक नेत्यांसोबत काढलेली छायाचित्रेही तिने दाखवली. घराच्या वरच्या भागात लहान स्वयंपाकघर आहे. बहीण-भाऊ खाली जमिनीवरच झोपतात.


जयेशने निमंत्रण पत्रिका दाखवून सांगितले की, २६ नोव्हेंबरला गेट वे ऑफ इंडियावर कार्यक्रम आहे. मुख्यमंत्रीही येतील. आम्हालाही बोलावले आहे. देविका म्हणाली,  दर वर्षी मला देशभर बोलावतात. कार्यक्रमाचे उद्घाटनही करून घेतात. नटवरलाल म्हणाले की, सन्मान तर खूप होतोय, पण त्याने पोट भरत नाही. नंतर ते व्यथा सांगू लागले. सहा वर्षांपासून मागील गल्लीत भाड्याने राहत होतो. घर मालक म्हणायचा की, रोज तर टीव्हीवर येतात. सरकारकडून कोट्यवधी रुपये मिळाले असतील. भाडे जास्त मिळेल. तीन महिन्यांआधी ९ हजार रुपये भाड्याने ही खोली घेतली. देविका म्हणाली की, आम्हाला सरकार आणि मोठ्या लोकांकडून कोट्यवधी रुपये मिळाले आहेत, असे आमचे नातेवाईक आणि इतरांना वाटते. पण सन्मान समारंभात जे पाच-दहा हजार रुपये मिळतात त्यातून घराचे भाडेच द्यावे लागते. आमच्या गावात ५ डिसेंबरला कुटुंबातच एक विवाह आहे. पण आम्हाला निमंत्रणही मिळाले नाही. पत्रिकेवर वडिलांचे नावही नाही. असे अनेक वर्षांपासून होत आहे. वडिलांनी विचारले की म्हणतात तुमचे तर दहशतवाद्यांशी शत्रुत्व आहे. आम्ही नाव टाकले तर आम्ही तुमचे   नातेवाईक आहोत हे सगळ्यांना कळेल. विनाकारण अडचणीत येऊ. दरम्यान, त्याच वेळी पाकिस्तानमधून सुटका झालेला मुंबई हल्ल्याच्या मास्टरमाइंड हाफिज सईदच्या बातम्या यायला लागल्या. देविका रागाने म्हणाली, जोपर्यंत सरकार त्याला पकडून भारतात आणत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही. वडिलांच्या म्हणण्यानुसार, जयेशने शर्ट उघडून पाठ दाखवली. मुलाच्या पाठीच्या कण्याचे वाकडे हाड दाखवून ते म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याच्या कण्याच्या हाडात टीबी आणि इन्फेक्शन झाले आहे. दहशतवादी हल्ल्याच्या वेळी देविकासोबत दीर्घ काळ रुग्णालयात राहिल्याने संसर्गामुळे हा आजार झाला आहे. आधी गळ्यात गाठ झाली. नंतर टीबी झाल्याचे कळाले. खासगी रुग्णालयात जयेशने केलेल्या उपचारांचा अर्धा खर्च रतन टाटा यांच्या सांगण्यानुसार ताज हॉटेलने केला. अर्धा आम्ही स्वत: केला.


दोन वर्षांपासून देविकाचे वजनही सतत घटत आहे. ती अशक्त आहे. तपासणी केल्यानंतर टीबी झाल्याचे कळाले. सरकारी रुग्णालयात उपचार केले. सध्या ती दररोज सकाळ-संध्याकाळ एक गोळी घेते.


नटवरलाल म्हणाले की, देविका रुग्णालयात असताना काँग्रेसचे अनेक नेते भेटीसाठी आले होते. राहण्याची सोय करू, असे आश्वासन त्यांनी दिले होते. पण ते पूर्ण झाले नाही. महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेकदा भेटलो आहे. घर देण्याची त्यांचीही इच्छा आहे. पण नोकरशाही हे काम होऊ देत नाही. आतापर्यंत सरकारी  मदत म्हणून फक्त ३ लाख २५ हजार रुपयेच मिळाले आहेत. न्यायालयाने आमच्या कुटुंबाच्या राहण्याची आणि मुलांच्या अभ्यासाची सोय करा, असे सांगितले होते, पण आता सरकारी अधिकारी म्हणतात की आम्हाला न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळाली नाही. न्यायालयाने तोंडी आदेश दिला होता. आता आदेश कुठून आणू?


देविका म्हणाली की, गेल्या वर्षी १२ ते १८ फेब्रुवारीदरम्यान मोदीजी आणि पीएमओच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर अनेक ट्विट केले. पण मला कुठलेही उत्तर मिळाले नाही. आता जेव्हा मोदींना भेटेन तेव्हा सर्व गोष्टी त्यांना सांगणार आहे. महाराष्ट्र सरकार म्हणते की, तुझे वडील राजस्थानचे आहेत. तेेथील सरकार तुला मदत करेल.

 

सरकार म्हणाले-२४ तास निगराणी करू शकत नाही 
महाराष्ट्र सरकारचे मुख्य प्रवक्ता राज के. पुरोहित यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, आम्हाला इतरही कामे आहेत. २४ तास कोणत्याही एका व्यक्तीची निगराणी करू शकत नाही. आता आमच्या लक्षात ही बाब आणून दिली आहे. आम्ही प्रयत्न करू. कुटुंबाला आमच्याकडे घेऊन या. सरकार योग्य मदत करेल.

बातम्या आणखी आहेत...