आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२६/११ प्रमाणेच दिला अग्नितांडवाशीही लढा, अाग विझवताना अग्निशमन दलाचे दाेन जवान शहीद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला यांनी रविवारी शहिदांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
मुंबई - काळबादेवी परिसरातील गोकुळ इमारतीला लागलेली भीषण अाग विझवताना शनिवारी मुंबई अग्निशमन दलातील महेंद्र देसाई आणि संजय राणे या दाेन अधिका-यांना वीरमरण अाले. २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळीही या दाेघांनी धाडसी कामगिरी केली हाेती. त्याबद्दल दोघांचाही राष्ट्रपती पदक देऊन गौरव करण्यात आला होता.

महेंद्र देसाई अग्निशमन दलात भायखळा अग्निशमन केंद्राचे प्रमुख होते. अजमल कसाब व इतर अतिरेक्यांनी २६ नाेव्हेंबर २००८ राेजीच्या रात्री मुंबईतील सीएसटी रेल्वेस्थानकात अंदाधुंद गोळीबार केला. त्यानंतर अग्निशमनच्या ज्या गाड्या सीएसटीकडे गेल्या त्या ताफ्याचे नेतृत्व देसाई यांनी केले हाेते. त्याच रात्री नरिमन पॉइंटच्या ट्रायंडट हाॅटेलमध्ये अतिरेकी हल्ल्यात लागलेली आग विझवण्यात देसाई यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. या धाडसी कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यपदक देऊन गौरवण्यात आले होते.
संजय राणे १९९२ मध्ये मुंबई अग्निशमन दलात दाखल झाले. २६/११ हल्ल्यावेळी गेटवे आॅफ इंडियाजवळील हाॅटेल ताजमध्ये लागलेली आग विझवण्यात राणे यांचा सहभाग होता. अतिरेक्यांच्या ग्रेनेडमुळे लागलेली ताजमधील आग दोन दिवस धुमसत होती. आपला जीव धोक्यात घालून बजावलेल्या या कामगिरीबद्दल राणे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यपदक देऊन गौरवण्यात आले होते.

२६ जुलै २००५ मध्ये मुंबईत आलेल्या पुराच्या संकटातही या दोन अधिका-यांनी धाडसी कमगिरी पार पाडली होती. राष्ट्रपती पदक प्राप्त धाडसी दोन अधिकारी एकाच वेळी गमावल्याने मुंबई अग्निशमन दलावर शोककळा पसरली आहे. या दाेन अधिका-यांना अग्निशमन दलाच्या वतीने भायखळा येथील मुख्यालयात रविवारी सकाळी अखेरची सलामी देण्यात आली.
क्वार्टरमधून काढू नका
आम्ही सध्या अग्निशमन दलाच्या क्वार्टरमध्ये राहतो. मुंबईत स्वत:चे आम्हाला घर नाही. माझ्या मुलीचे एमबीबीएसचे दुसरे वर्ष चालू आहे. तरी कृपा करून या सरकारी निवासस्थानातून आम्हाला काढू नका, अशी मागणी महेंद्र देसाई यांची पत्नी मानसी यांनी केली आहे.
लाकडांनी घात केला
गाेकुळ इमारतीचे बांधकाम चालू होते. त्यासाठी चारही मजल्यांना लाकडी टेकू दिले हाेते. आग लागल्याने टेकू जळाले अाणि इमारतीचा भाग कोसळला. त्याखाली दबून या दोन अधिका-यांचा मृत्यू ओढवल्याचे अग्निशमन दलातील एका अधिका-याने सांगितले.

चाैकशीसाठी समिती
>आगीची चौकशी करण्यासाठी पालिका आयुक्तांनी एक समिती नेमली आहे. तीन महिन्यांत ही समिती अहवाल देणार अाहे.
> शहीद जवानांना राज्य सरकार सात दिवसांत मदत देणार
>शहिदांच्या कुटुंबीयांना पालिका सेवेत सामावून घेण्यात येणार.
>जखमी अधिकारी सुधीर अमीन आणि सुनील नेसरीकर यांच्यावर ऐरोलीतील बर्न सेंटरमध्ये उपचार
>शहीद अधिका-यांना करण्यात येणा-या मदतीबद्दल पालिकेत सोमवारी तातडीची बैठक.