आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • They Not Kirit, But Canny Sommaiya, Allegation Of Sachin Sawant

ते किरीट नव्हे, तर कुटिल सोमय्या आहेत; कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांचे प्रत्युत्तर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - किरीट सोमय्या हे भाजपच्या आधुनिक गोबेल्सच्या टीमचा भाग असल्यामुळेच ते मुख्यमंत्र्यांवर बेछूट आरोप करत आहेत. ते किरीट नव्हे, तर कुटिल सोमय्या आहेत, अशा शब्दांत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी रविवारी सोमय्यांचा समाचार घेतला.


दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाच्या बदल्यात विकासक के. एस. चमणकर यांना करारापेक्षा अधिक चटईक्षेत्र बहाल केले गेले. ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ तत्त्वावर बांधण्यात आलेल्या या प्रकल्पाला 72 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. त्याच्या मोबदल्यात चमणकर यांना मुंबईत 100 कोटी रुपयांचे चटईक्षेत्र देण्यात येणार होते. परंतु चव्हाण यांच्या अखत्यारीतील नगरविकास खात्याने त्यांच्यावर सुमारे 1 हजार कोटी किमतीच्या चटईक्षेत्राची खैरात केली, असा आरोप सोमय्या यांनी केला होता.


मुख्यमंत्र्यांवर सोमय्यांनी केलेले आरोप खोडताना सावंत म्हणाले, महाराष्ट्रातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत 225 चौरस फुटांची घरे दिली जात असताना अडीच एफएसआय देण्यात येत होता. परंतु आता या योजनेत दिल्या जाणा-या घरांचे क्षेत्रफळ वाढवून 269 चौरस फूट करण्यात आल्याने एफएसआयदेखील तीनपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे सोमय्या यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांवर केलेले आरोप खोडसाळ आणि लोकांची दिशाभूल करणारे आहेत.


शासनाने गरिबांच्या घरांचे क्षेत्रफळ वाढवण्याचा निर्णय घेतलेला असताना भाजपची इच्छा मात्र गरिबांनी केवळ 225 चौरस फुटांच्या घरावर समाधान मानावे अशी आहे का, असा सवालही त्यांनी पत्रकार परिषदेत केला.


आरोपांचे हुकमी प्रयोग
भाजपने त्यांच्या निवडणूक प्रचार मोहिमेचा भार ‘आधुनिक गोबेल्स’वर सोपवला आहे. सोमय्यादेखील याच पथकाचा एक भाग आहेत आणि मुख्यमंत्र्यांवर बेताल आरोप करत आहेत. मुख्यमंत्री लोकांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील आहेत. परंतु सोमय्या मात्र जनतेची दिशाभूल करत आहेत. किंबहुना काँग्रेसशासित राज्यांत जाऊन तेथील मुख्यमंत्र्यांवर बेछूट आरोप करण्याचा हुकमी प्रयोग ते सादर करत असतात, अशा शब्दांत सावंत यांनी सोमय्यांवर शरसंधान साधले.