आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Third Frant Again Active, Hope Rises Success Of Aam

फुटलेली तिसरी आघाडी पुन्हा सक्रीय, आम आदमी पक्षाच्या यशांने आशा पल्लवीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दिल्लीतील निवडणुकांत ‘आप’ला मिळालेल्या यशामुळे महाराष्‍ट्रातील ‘रिडालोस’च्या घटक पक्षांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात तिस-या आघाडीची चाचपणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, मागील विधानसभा निवडणुकीत ‘रिडालोस’ या तिस-या पर्यायाला मतदारांनी पूर्णत: झिडकारले होते.
‘मातोश्री’वर मंगळवारी स्वाभीमानी शेतकरी संघटनेची महायुतीशी बोलणी चालू होती. त्याचवेळी जनता दलाच्या प्रदेश कार्यालयात ‘रिडालोस’मध्ये उरलेल्या पक्षांची खलबते चाललेली होती. स्वाभीमानी शेतकरी संघटना आणि रिपाइंचा आठवले गट मागच्या विधानसभेला ‘रिडालोस’मध्ये होते. यावेळी हे दोन्ही गट महायुतीत आहेत. तसेच ‘भारिप’च्या प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्‍ट्र डेमोक्रेटीक फ्रंट नावाने 23 पक्षांची वेगळी आघाडी पूर्वीच जाहीर केली आहे. त्यामुळे मंगळवारी झालेल्या या बैठकीला शेतकरी कामागार पक्षाचे आमदार जयंत पाटील, ‘माकप’चे अशोक ढवळे, ‘भाकप’चे भालचंद्र कांगोआणि जनता दलाचे प्रताप होगाडे अशी काही मोजकी मंडळीच हजर होती. राज्यातील जनता, काँग्रेस आणि भाजपच्या राजकारणाला कंटाळलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘आप’ला राज्यात मोठा पाठिंबा मिळू शकतो. राज्यातील जनतेने तिसरा पर्याय म्हणून ‘आप’ला स्वीकारण्यापूर्वी आपण ती जागा व्यापायला हवी, असा निर्णय बैठकीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ज्या ‘शेकाप’च्या जीवावर तिस-या आघाडीची हाकाटी डावे पक्ष देत आहेत, तोच शेकाप महायुतीत सामील होणार असल्याचे गोपीनाथ मुंडे यांनी ‘रिडालोस’ची बैठक चालू असतानाच जाहीर केले आहे. त्यामुळे निवडणुकीचे बिगुल फुंकले जाण्यापूर्वीच तिस-या आघाडीचे तीन तेरा वाजण्याची चर्चा होती.
दिवास्वप्नं राहणार
स्वाभीमान आणि रिपाइं सध्या महायुतीत आहेत. ‘भारिप’ची काँग्र्रेसशी बोलणी सुरु आहेत. ‘सपा’ची स्वतंत्र चूल आहे. अशा परस्थितीत आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यापुरती तिसरी आघाडीची स्थापना दिवास्वप्नं ठरण्याची शक्यता अधिक आहे.