आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी सिनेमा : यंदाचा 'मिफ्टा' सिंगापूरमध्ये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- काहीतरी भव्यदिव्य करून आपली किंमत दाखवून देण्यासाठीच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभिमान म्हणून मिफ्टाचा जन्म झाला आणि सलग तिसर्‍या वर्षी आम्ही परदेशी उड्डाण करणार आहोत याचा आनंद वाटतो. गेल्या वर्षी आम्ही 300 लोकांना घेऊन गेलो होतो.
दरवर्षी हा आकडा वाढत जाईल आणि ज्या दिवशी आम्ही 1000 लोक इथून मिफ्टासाठी घेऊन जाऊ तेव्हाच काहीतरी मिळवल्याचे समाधान वाटेल,' अशा भावना मिफ्टाचे सर्वेसर्वा आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी यंदाच्या मिफ्टा पुरस्कार सोहळ्याची घोषणा करताना व्यक्त केल्या.
मराठी अभिमान सातासमुद्रापार नेण्याचा चंग बांधलेला 'मिफ्टा 2012' यंदा सिंगापूर येथे रंगणार आहे. 2009 ला दुबईत, 2010 ला लंडन आणि आता सिंगापूर अशी मजल दरमजल करत 'मिफ्टाने' जगातल्या सर्व प्रमुख देशांत हजेरी लावावी असे बोलत 'केसरी टूर्स'च्या वीणा पाटील यांनी 'मिफ्टा' टीमला भक्कम पाठिंबा दर्शवला. लंडनमध्ये झालेल्या मिफ्टा सोहळ्यात पुढील सोहळा अमेरिकेत करण्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे हा सोहळा अमेरिकेऐवजी सिंगापूर येथे घेण्याचे ठरले.
ठाण्यातही कार्यक्रम- 'मिफ्टा'चे निमित्त साधून 2 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर नाट्यचित्रपट महोत्सव साजरा केला जाणार आहे. यात गेल्या वर्षभरातील 10 मराठी चित्रपट व 10 नाटके दाखवण्यात येतील अशी माहिती 'मिफ्टा'चे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिली. यासाठी इच्छुक दिग्दर्शकांनी miftaawards.com या संकेतस्थळावर अर्ज भरावेत, असे आवाहनही करण्यात आले.
महेश मांजरेकर यांच्या आगामी कुटूंब सिनेमाचा फस्र्ट लूकही यावेळी दाखवण्यात आला. प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर, सचिन पिळगांवकर, भारती आचरेकर, लता नार्वेकर यांच्यासह मराठीतील अनेक नामवंत कलाकारांनी हजेरी लावली.