आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रश्मी ठाकरे, वायकरांची हजार कोटींची जमीन- संजय निरुपम यांचा अाराेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे व शिवसेनेचे राज्यमंत्री रवींद्र वायकर यांची पत्नी मनीषा वायकर यांनी कोकणात १ हजार कोटी किमतीची जमीन खरेदी केली आहे. रायगड जिल्ह्यातील मुरूड समुद्रकिनारी ११० एकर तसेच दापोली, राजापूरला ४५० एकर जमीन खरेदी करण्यात आली असून यासाठी राज्यमंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी पुढाकार घेतला आहे, असा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला. हा पैसा आला कुठून याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

मुरूड समुद्रकिनारी खरेदी करण्यात आलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर रश्मी व मनीषा यांची नावे आहेत. तुकड्यांमध्ये या जमिनी खरेदी करण्यात आल्या. काही जमिनी वायकर यांच्या भागीदारांनीही घेतल्या आहेत. हाॅटेल्ससाठी या जमिनीची खरेदी झाली असावी, अशी माहिती समोर येत आहे. मुंबई महापालिकेतील रस्ते, नाले सफाई घोटाळ्यातील हा पैसा तर नव्हे ना, याचीही चौकशी हाेणे गरजेचे आहे, असे निरुपम म्हणाले.

चौकशी करा अन्यथा लोकायुक्तांकडे जाणार
जोगेश्वरीत मजास आगार परिसरात स्वप्नपूर्ती हा एसआरए प्रकल्प असून तो विजयालक्ष्मी ग्रुपतर्फे राबवला जाताे. या ग्रुपमध्ये वायकरांसोबत विकास कंवर, दिलीप शृंगारपुरे व गुरुबीरसिंग गुप्ता भागीदार आहेत. शिवाय वायकर यांच्या १६ कंपन्या असून त्यांच्या गैरव्यवहाराचे कागदपत्रे आम्ही मुख्यमंत्र्यांना दिले होते. पण, आरेतील जिमचे अनधिकृत बांधकाम व जाेगेश्वरी परिसरातील ६ एसआरए प्रकरणात वायकरांना क्लीन चिट दिली. मुख्यमंत्री मातोश्रीवर स्नेहभोजनास गेले होते. या भोजनाचे उद्दिष्ट क्लीन चिट देणेच होता, असाही आरोप निरुपम यांनी केला. या सर्व प्रकरणांची कायदेशीर चौकशी करावी, अन्यथा लोकायुक्तांकडे जाऊ, असे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...