आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री लोणीकरांचा भांडाफोड करणा-या सचिन सावंताना अज्ञातांकडून धमक्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्याचे पाणी पुरवठामंत्री बबन लोणीकर यांच्या पदवीचा व दोन पत्नी असल्याचा भांडाफोड करणारे प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना अज्ञातांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहेत. याबाबतची माहिती खुद्द सचिन सावंत यांनी दिली असून, ते पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार केली आहे.
पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या शिक्षणाचा घोळ सावंत यांनी चव्हाट्यावर आणला होता. बबनराव लोणीकरांनी 2004, 2009 व 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांमधील शिक्षणाबाबतची विसंगत माहिती दिल्याचे सावंत यांनी उजेडात आणले होते. त्यामुळे बबनरावांचे नेमके शिक्षण किती व कधी झाले असा सवाल उपस्थित होऊ लागला होता. त्यानंतर सावंत यांनी लोणीकर यांच्यावर आणखी एक बॉम्बगोळा टाकत त्यांची दोन लग्ने झाल्याचे व एका पत्नीची माहिती दडवल्याचा आरोप केला. कौटुंबिक सदस्यांची मालमत्ता दडविल्याचाही त्यांच्यावर सावंतांनी आरोप केला. यानंतर लोणीकरांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षांनी केली होती.
या संपूर्ण प्रकरणावर भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारण केलेल्या मौनावर सचिन सावंत यांनी कडाडून टीका केली होती. विरोधी पक्षात असताना बिनबुडाचे आरोप करून तत्कालीन मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे फडणवीस आज त्यांच्याच मंत्रीमंडळातील कॅबिनेट मंत्र्याविरूद्ध इतके ठोस पुरावे असतानाही तोंडावर बोट ठेवून का बसले आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. यानंतर मात्र लोणीकरांचा संयम सुटला होता. लोणीकर यांनी सचिन सावंत यांना मानहानीचा खटला दाखल करून न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला होता. यानंतर लोणीकरांनी माझ्याविरूद्ध मानहानीचा खटला दाखल करावाच, असे आव्हान सचिन सावंत यांनी दिले. लोणीकरांनी खटला भरल्यास त्यातून आणखी बरेच काही जनतेसमोर येईल, असे सांगत लोणीकरांना डिवचले होते. दरम्यान, या प्रकरणात सावंत यांची सरशी झाल्याने व भाजपसह लोणीकर अडचणीत सापडल्याने सावंत यांना अज्ञातांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...