आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - रुग्णालयातून होणा-या अर्भकांच्या चो-या थांबवण्यासाठी सुरक्षा व्यवस्था कडक करण्याबरोबरच आता अर्भकांच्या बोटांचे ठसे घेण्याचा आदेश आरोग्य विभागाने दिला आहे. त्यामुळे एखादी अप्रिय घटना घडल्यास त्यांचा शोध घेणे शक्य होऊ शकेल, असे विभागाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्देशांवरून आरोग्य विभागाने हे परिपत्रक काढले आहे. मूल जन्माला येताच दोन तासांच्या आत त्याच्या हात व पायांचे ठसे, जन्मखूण असल्यास त्याची नोंद रुग्णालयाने करून घ्यावी, असे सांगण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सरकारी रुग्णालयांतून अर्भक चोरीचे प्रमाण वाढले असून त्यावर उपाययोजनेचा भाग म्हणून काही पावले उचलली जात असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिका-याने दिली.
नातेवाइकांचीही नोंद होणार
नवजात बालकाला पाहायला येणा-या नातेवाइकांना त्यांचे नाव, पत्ता अशा माहितीची नोंदणी रजिस्टरवर करूनच आत सोडले जाईल. तसेच विशिष्ट वेळांमध्येच भेटण्याची परवानगी दिली जाईल. बालकांच्या वॉर्डबाहेर सुरक्षा रक्षक आणि आतमध्ये महिला सुरक्षा रक्षक तैनात करण्यात यावेत. ज्या रुग्णालयांमध्ये अंगठ्याचे ठसे घेण्याची सुविधा नसेल त्यांनी 6 महिन्यांच्या आत ती सुरू करावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे लावा
कोणत्याही बाळाला तेथील नर्स किंवा तत्सम अधिकारी व्यक्तीच्या परवानगीशिवाय बाहेर घेऊन जाता येणार नाही. प्रसूती वॉर्डमधून बाहेर पडणा-या प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी तेथील कर्मचा-यांची असून कोणीही व्यक्ती बाळाला घेऊन बाहेर पडत नाही याबाबत त्यांनी दक्ष रहायला हवे. काही रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, पण इतरांनीही ते लावावेत, असेही या परिपत्रकात म्हटले आहे. खासगी रुग्णालयांपेक्षा सरकारी रुग्णालयांतून मूल चोरीला जाण्याच्या घटना जास्त असून तेथे येणारे रुग्ण आणि नातेवाईक यांच्या गर्दीमुळे हे प्रकार सहज घडतात. तसेच सुरक्षा व्यवस्थेतही काही त्रुटी असून त्या दूर करण्याची गरज असल्याचे त्या अधिका-याने सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.