आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याकूबच्या हत्येचा बदला घेईल, टायगरचा आईला फोन; न्यायाधीशांनाही धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 1993मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटातील दोषी याकूब मेमनला फाशी दिली जात होती, त्याच्या केवळ 40 मिनिटे आधी टायगर मेमनने आपल्या आईसोबत संवाद साधल्याचा गौप्यस्फोट एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे.

दुसरीकडे, याकूबला फाशीची शिक्षा सुनावणारे न्यायाधीश दीपक मिश्रा यांना निनावी धमकीचे पत्र प्राप्त झाले आहे. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरु केली आहे. धमकीच्या पार्श्वभूमीवर न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याशिवाय सुनावणी करणार्‍या दोन न्यायाधीशांच्या सुरक्षेत वाढ करण्‍यात आली आहे.

टायगरने केली बदल्याची भाषा...
'मी त्यांना सोडणार नाही. याकूबच्या हत्येचा बदला घेईल', अशी बदल्याची भाषाही टायगरने फोनवरून आई हनीफासोबत केलेल्या संभाषणात केली. माहिममध्ये अल हुसैनी नावाच्या बिल्डिंगमध्ये मेमन कुटुंब राहते. घरातील लँडलाईन नंबरवर 30 जुलैला पहाटे 5 वाजून 35 मिनिटांनी टायगरने फोन केल्याचे प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे. आपला फोन पोलिसांकडून ट्रेस होऊ नये म्हणून, टायगरने अवघ्या तीन मिनिटांत आपले संभाषण संपवले.

टायगर वारंवार बदल्याची भाषा करत असल्याने हनिफा रडायला लागल्या आणि हनिफा म्हणाल्या, 'आता पुरे झाले, विध्वंस थांबव. मी आधीच याकूबला गमावले आहे. आता या वयात एवढे दु:ख पाहू शकत नाही.'

दहशतवादी हल्ल्याची शक्यता..
मोस्ट वॉन्टेड टायगर मेमनने आईला फोन केल्यावरून मुंबईसह देशातील इतर शहरात दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला असून टायगरचा कॉल ट्रेस करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, हा कॉल व्हाइस इंटरनेट प्रोटोकॉलने केला आहे. टायगरचा फोन तीन मिनिटांपेक्षा कमी कालावधीचा होता. त्यामुळे कॉलचा आयपी अॅड्रेस ट्रेस होण्यास अडचणी येत असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

दरम्यान, टायगर हा याकूबचा थोरला भाऊ व मुंबई बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा तो हस्तक आहे. टायगर 22 वर्षांपासून फरार आहे. मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवून टायगरने पाकिस्तानात पलायन केले आहे.

काय म्हणाले अधिकारी...
गृहमंत्रालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव के.पी. बख्शी यांनी सांगितले की, टायगर आणि त्याच्या आईचा फोनवरुन झालेल्या संभाषणाबाबत माहिती नाही. तसेच महाराष्ट्राचे डीजीपी यांनी देखील अद्याप सेंट्रल एजन्सीला अद्याप कोणताही अहवाल सादर केलेला नाही. दुसरीकडे, याकूबचे वकील श्याम केसवानी यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, संबंधित फोटो...