आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंबाखूमिश्रित खर्रा, बार, माव्यावरही राज्यात बंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गुटखाबंदीच्या निर्णयाला एक वर्षाची मुदतवाढ देताना राज्य सरकारने आता मावा, खर्रा, जर्दा, सुगंधित सुपारी व सुगंधित तंबाखूवरही बंदी लागू केली. त्यामुळे बाबा, रत्ना, चैनी-खैनी अशा अनेक उत्पादनांवर बंदी आली आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे राज्यमंत्री सतेज पाटील यांनी गेल्या आठवड्यात गुटखाबंदीला मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा विधिमंडळात केली होती. याची व्याप्ती वाढवून आरोग्याला अपायकारक असलेल्या इतर पदार्थांचा समावेश यात करण्यात आला असल्याचे पाटील यांनी सोमवारी सांगितले.

गेले वर्षभर गुटखाबंदी लागू झाल्यानंतर 20 ते 22 कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यातील 12 कोटींचा गुटखा नष्ट करण्यात आल्याचे पाटील म्हणाले.

अन्न व औषध प्रशासन कायद्यानुसार, आरोग्यासाठी हानिकारक उत्पादनांवर आयुक्त एक वर्षाची बंदी घालू शकतात. त्यानुसार गेल्या वर्षापासून गुटखाबंदी होती. याबाबत मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयातही प्रकरण प्रलंबित असून अद्याप राज्य सरकारच्या या निर्णयाला स्थगिती देण्यात आलेली नसल्याने हा निर्णय कायमस्वरूपी लागू होईल, असा विश्वासही पाटील यांनी या वेळी व्यक्त केला. देशातील 26 राज्ये आणि पाच केंद्रशासित प्रदेशांत ही बंदी लागू झाल्याने महाराष्ट्रातही बंदीला न्यायालयाकडून सकारात्मक पाठिंबा मिळेल, असे ते म्हणाले.


साधी तंबाखू, सुपारीला सूट
० साध्या स्वरूपातील तंबाखू आणि सुपारी सोडून इतर सर्व तंबाखूजन्य उत्पादनांना ही बंदी लागू. मुंबई भागातील मावा, विदर्भातील खर्राही बंद.
० पानमसाला फ्लेवर्ड, सेंटेड सुपारी, तंबाखू, अ‍ॅडिक्टिव्ह मिश्रित तंबाखू आणि सुपारी या पदार्थांच्या उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीला मनाई.

तंबाखू लॉबीशी सरकारचे साटेलोटे : सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

नवी दिल्ली । यापुढे दुकानांवर तंबाखू उत्पादनाच्या जाहिराती लावता येणार नाहीत. कॅन्सरने लोक रोज मरत असताना सरकार मात्र तंबाखू लॉबीशी हातमिळवणी करत आहे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. तंबाखू उत्पादनासंबंधी जाहिरातींचा नियम देशभर लागू होईल. दुकानांवर तंबाखू उत्पादनाच्या जाहिरातींवर बंदी घालताना आकाराची मर्यादा न्यायालयाने ठरवून दिली. यासोबतच मुंबई हायकोर्टाने अशा जाहिरातीसंबंधी कायद्यावर 2005 मध्ये दिलेला स्थगिती आदेशही रद्द करण्यात आला आहे.


औरंगाबादेत 5 लाखांची उलाढाल
औरंगाबाद । सुगंधित तंबाखूवर बंदी जाहीर होताच शहरातील 20 हजार टपर्‍यांवर मावा किंवा बार मिळणे बंद झाले. सूर्यछाप, गायछाप व सिगारेटवर मात्र ही बंदी लागू नाही. शहरात तंबाखूचा ठोक व किरकोळ व्यापार करणारी 30 हून अधिक दुकाने आहेत. रोज 5 लाखांपेक्षा अधिक उलाढाल तंबाखूच्या व्यापारातून होत असल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली.