आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'आज बलात्कारी ठरविले, उद्या आतंकवादीही ठरवतील', तरूणाचा संताप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘मुलीचं लग्न ठरलंय... शक्तीमिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी म्हणून माझा फोटो मंगळवारी काही वर्तमानपत्रात छापला गेला. तो पाहून वर पक्षाकडील लोक आता संशयाने पाहू लागलेत. नावाची खराबी तर झालीच पण, यामुळे मुलीचं लग्न मोडू नये, एवढीच अल्लाकडे प्रार्थना करतोय...,’ अशा भावना वाशी मार्केटमध्ये ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणा-या 45 वर्षीय मेहबूब खान यांनी ‘दिव्य मराठी’जवळ व्यक्त केल्या. ‘वर्तमानपत्रांनी आज बलात्कारी ठरविले, उद्या आतंकवादीही ठरवतील,’ अशा प्रतिक्रियाही या छायाचित्रातील काहींनी व्यक्त केल्या.


गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी धारावीत ईदनिमित्त कव्वालीचा कार्यक्रम ठेवला होता. तो पाहण्यासाठी खान आपल्या तीन मित्रांसह गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी अहिर यांच्याबरोबर ग्रुप फोटो घेतला. ही घटना आहे 2010 मधली. या फोटोत बलात्कार प्रकरणातील आरोपींचा सहभाग असल्याचा दावा करत मंगळवारी मुंबईतील काही सायंदैनिकांनी तो छापला. कोणतीही सहनिशा न करता छापलेल्या या बातमीमुळे या चौघा निरापराधांच्या आयुष्यात मात्र, वादळ उठले आहे.


अब्दुल अन्सारी हार्डवेअर इंजिनिअर आहेत. धारावीत त्यांचा स्वत:चा व्यवसाय आहे. ‘वर्तमानपत्रात तो फोटो पाहून मला धक्का बसला. त्या दिवशी माझा फोन दिवसभर खणखणत होता. पोलिस स्टेशनमधूनही फोन आला. कंप्युटर दुरुस्तीची माझ्याकडील कामे कमी होतील’, अशी भीती व्यक्त केली.


इक्बाल शेख इलेक्ट्रीक वायरमन आहेत. फोटोमुळे त्यांचीही बदनामी झाली. अनेकांनी काम नाकारल्याचं त्यांच म्हणणं आहे. त्यांना दोन मुली आहेत. या बदनामीमुळे त्यांच्या दोन्ही मुली मंगळवारी शाळेत गेल्या नव्हत्या. त्यांची पत्नी ग्रॅज्युएट आहे. या बातमीमुळे पत्नीला मोठा धक्का बसल्याचं शेख यांनी सांगितले.


आरोप मंत्र्यांवर, बळी सामान्यांचा!
भाजपने पत्रकार परिषद घेऊन या कार्यक्रमाचे फोटो माध्यमांनी पुरवले. या प्रकरणाचे त्यांनी राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला. माहितीची खातरजमा न करता मंत्री सचिन अहिर यांच्यावर आरोप केले. त्याबाबत अहिर संबधितांना कोर्टात खेचतील. पण यात सामान्य घरातील चार तरुणांच्या अब्रूची आहुती हकनाक पडली त्याचं काय.... ?