आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today Nationalist Congress Oraginsed All Languages Workers Summit In Mumbai

मुंबईत आज राष्‍ट्रवादीचे सर्वभाषिक श्रमजीवी संमेलन, शरद पवार करणार मार्गदर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबई शहरात ताकद वाढवण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही कंबर कसली असून शनिवारी सर्वभाषिक श्रमजीवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे घोषवाक्य ‘देशात कुठेही जाऊन कष्टाची भाकरी मिळवणे हा माझा मूलभूत हक्क आहे’ असे असून या वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत.


शिवसेनेने मराठी मतांसह परप्रांतीयांची मते मिळावीत म्हणून त्यांच्या विरोधातील आपला विरोध कमी केला आहे. एवढेच नव्हे तर छटपूजेलाही शिवसेनेने साथ दिली. तसेच काही ठिकाणी उत्तर भारतीय शिवसेना महिला शाखाही स्थापन केल्या. मुंबईत यश मिळवायचे असेल तर परप्रांतीयांच्या मतांशिवाय पर्याय नाही हेच शिवसेनेने दाखवून दिले. खरे तर परप्रांतीयांची मते काँग्रेसच्या पारड्यात जातात. मात्र, शिवसेनेने त्यात उडी घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीनेही परप्रांतीयांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू केल्याची माहिती राष्ट्रवादीतील सू्त्रांनी दिली. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे तीन उमेदवार थोड्या फरकाने हरले होते. काँग्रेसचे संजय निरुपम, कृपाशंकर सिंह अशा काही उत्तर भारतीय नेत्यांना या मतांचा फायदा झाला होता. यंदा मात्र काँग्रेस आणि शिवसेनेला परप्रांतीयांची मते मिळू द्यायची नाहीत, असा प्रयत्न राष्ट्रवादी करणार आहे.


राज ठाकरे यांच्यावर संमेलनाच्या पत्रकात टीका
संमेलनासाठी छापलेल्या पत्रकात परप्रांतीयांना विरोध करणा-या राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका करण्यात आली आहे. पत्रकात म्हटले आहे की, मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून प्रमुख औद्योगिक केंद्र आहे. येथे रोजगार मिळवण्यासाठी विविध राज्यांतून लोक येतात. ना कुणाशी भांडण ना वैर, कायद्याच्या चाकोरीत राहून हे सर्व परप्रांतीय गुण्या-गोविंदाने मुंबईत राहतात. मात्र, काही नेत्यांनी राजकीय हेतूने त्यांच्यावर अनेक वेळा हल्ले केले व करत आहेत. ठोकशाहीचे हे कृत्य देशाच्या घटनेचा अवमान करणारे असल्याने आपण सर्वांनी संघटित होऊन त्याचा प्रखर विरोध करणे आवश्यक आहे.


अजित पवार यांच्यासह अर्धा डझन मंत्र्यांची उपस्थिती
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची जनमानसातील प्रतिमा लक्षात घेऊन त्यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून संमेलनात आमंत्रित करण्यात आले आहे. श्रमजीवी वर्गाला पवार प्रथमच संबोधित करणार असल्याचेही सांगण्यात आले. या संमेलनाला राष्‍ट्रवादी कॉँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेतेही उपस्थित राहणार आहेत. यात उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री आर.आर. पाटील, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील आणि संपर्कमंत्री सचिन अहिर यांच्यासह सर्वच दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.