आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखर कारखाने विक्रीविरोधात आज मोर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गेल्या सात वर्षात राज्यात 40 सहकारी साखर कारखान्यांची विक्री झाली असून यामध्ये 10 हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. या विक्री व्यवहाराची न्यायालयानी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक
अण्णा हजारे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.


उर्वरित कारखान्यांची विक्री थांबवण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी मुंबईत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्‍ट्र राज्य राष्‍ट्रीय साखर कामगार फेडरेशनच्यावतीने काढण्यात येणा-या या मोर्चाचे नेतृत्व अण्णा करणार आहेत. ‘देशात सहकाराची मुहूर्तमेढ महाराष्‍ट्राने रोवली. त्याच राज्यात सहकार मोडीत काढण्याचे प्रयत्न चालू आहेत. या षड्यंत्रामध्ये शिखर बँक, मंत्री आणि विरोधक यांचा सहभाग आहे. कारखाने विक्री बंदीचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. तरीही शिखर बँक कारखान्याची विक्री करत असून शासन आणि सहकार महर्षी यांचे या व्यवहारात साटेलोटे आहे,’ असा आरोपही हजारे यांनी केला.


राज्यातील 40 सहकारी साखर कारखाने कवडीमोल दराने विकण्यात आले आहेत. उर्वरित 60 कारखाने विक्री करण्याचा घाट शिखर बँकेने घातला आहे. त्याला आम्ही विरोध करण्यासाठी राज्यात जेलभरो आंदोलन हाती घेणार आहोत. सहकारातल्या दादांना पैशाची घमेंड चढली आहे. कारखान्याचे कर्मचारी, शेअर्सधारक शेतकरी आमच्या आंदोलन उतरतील. शेतक-यांच्या ठेवी, शेअर्स, जमिनी आणि कर्मचा-यांची देणी परत मिळाल्याशिवाय एकही कारखाना विकू देणार नाही, असा इशारा हजारे यांनी दिला.


कारखान्यात काळा पैसा
काळा पैसा पांढरा करण्यासाठी खासगी साखर कारखाने खात्रीचा मार्ग आहे. त्यामुळेच राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांनी खासगी कारखाने निर्मितीचा सपाटा लावल्याचे अण्णांनी सांगितले.


मुख्यमंत्री आंधळे
कोणत्या मंत्र्याने कोणता कारखाना कसा घशात घातला, हे मुख्यमंत्र्यांना माहीत आहे. पण त्यांनी आंधळ्याचे सोंग घेतल्याने सहकारातील गुंडापुंडांचे फावत असल्याचा अण्णांनी केला.