आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today Shiv Sena Tie Shivbandhan, Activist Take Sworn

शिवसेना बांधणार आज ‘शिवबंधन’, कार्यकर्त्यांना दिली जाणार पक्षनिष्‍ठेची प्रतिज्ञा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर शिवसैनिकांना शिवबंधनात अडकवण्याचे काम शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी सायन येथील सोमय्या मैदानावर होणार्‍या भव्य मेळाव्यात कार्यकर्त्यांना पक्षनिष्ठेची प्रतिज्ञा दिली जाणार आहे. या मेळाव्यास राज्यातील लाखो शिवसैनिक येणार असल्याचा दावा आमदार दिवाकर रावते यांनी केला आहे.
भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या महागर्जना रॅलीला शिवसेना ‘प्रतिज्ञादिना’ने उत्तर देणार असल्याची राजकीय वतरुळात चर्चा आहे. मात्र हा फक्त शिवसैनिकांचा मेळावा असल्याचे दिवाकर रावते यांनी सांगितले. ‘प्रतिज्ञा दिनासाठी सर्व गटप्रमुखांपर्यंतच्या पदाधिकार्‍यांना बोलावण्यात आलेले आहे. ही संख्या जवळ-जवळ एक लाखाच्या आसपास आहे. त्यांच्याशिवाय राज्यभरातून शिवसैनिकही येणार असल्याने हा आकडा प्रचंड मोठा होऊ शकतो. शिवाजी पार्क आणि बीकेसीतील मैदानापेक्षा सोमैया मैदान प्रचंड मोठे असल्याने लाखो शिवसैनिकांना हे मैदान आरामात सामावून घेऊ शकते,’ असेही रावते म्हणाले.
दुपारी दोन वाजता सुरू होणार्‍या या कार्यक्रमाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, रामदास कदम, मनोहर जोशी, दिवाकर रावते, चंद्रकांत खैरे यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते, खासदार आणि आमदार उपस्थित राहाणार आहेत. या कार्यक्रमात देण्यात येणार्‍या शिवबंधनाचे पावित्र्य शिवसैनिक पाळतील आणि विधानसभेवर भगवा फडकेल, असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे आकर्षण
0 शिवसेनाप्रमुखांवरील पोवाडे सोमय्या मैदानावर सादर होणार
0 प्रत्येक शिवसैनिकाच्या मनगटावर बांधणार भगवे शिवबंधन
0 उपस्थित लाखो कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे देतील प्रतिज्ञा
0 मनोहर जोशींसह सर्व दिग्गज नेते उपस्थित राहणार.