आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Toilets For Women At Public Place, Ajit Pawar Order

सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह असणे आवश्यकच, अजित पवार यांचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - टोल नाके, पेट्रोलपंप, शासकीय-निमशासकीय कार्यालये, बसस्थानके यासारख्या सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बंधनकारक करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिले. स्वच्छतागृहांच्या दैनंदिन साफसफाईसंदर्भात पाणीपुरवठा, स्वच्छता विभागाने सर्वंकष प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही पवार यांनी दिले.


मंत्रालयात झालेल्या बैठकीस महिला व बालविकासमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, स्वच्छतामंत्री दिलीप सोपल, राज्यमंत्री प्रा. फौजिया खान, उदय सामंत, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार आदी उपस्थित होते. आमदार निधीतून राज्यातील अधिकाधिक बसस्थानकांमध्ये स्वच्छतागृहे उभारणीसाठी प्रयत्नशील आहोत; पण त्याचबरोबर रस्ते आणि महामार्गांवरही स्वच्छतागृहांची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे पवार म्हणाले. येत्या सहा महिन्यांत टोल नाक्यांवर प्रवाशांसाठी, विशेषत: महिलांसाठी पुरेशा स्वच्छतागृहांची निर्मिती बंधनकारक केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


पेट्रोल पंपांवरही महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह गरजेचे असून पेट्रोल पंपांना ना हरकत प्रमाणपत्र देतानाच ही अट घालावी, त्याबाबत विधी व न्याय विभागाचेही अभिप्राय घ्यावेत, अशा सूचनाही या वेळी करण्यात आल्या.
एक लाखापेक्षा जास्त भाविक किंवा पर्यटक येत असतील अशा ठिकाणी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून स्वच्छतागृहे उभारली जातील. रस्त्यांच्या कामातही शौचालय उभारण्याचा समावेश केला जाईल. मुंबईतही उड्डाणपुलांखाली स्वच्छतागृहे उभारण्यास परवानगी मिळावी म्हणून स्वच्छता विभागाने न्यायालयाला विनंती करावी, असेही पवार यांनी या वेळी सुचवले.


स्वच्छतेबाबतही प्रस्ताव सादर करा
स्वच्छतागृहांची व्यवस्था केल्यानंतर त्यांची नियमितपणे सफाई आवश्यक असते. स्वच्छतागृहांची दुरवस्था होऊ नये याचाही प्रस्तावात समावेश करावा. शासकीय ठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहांच्या अस्वच्छतेबाबत संबंधित कार्यालय किंवा विभागप्रमुखास जबाबदार धरल्याशिवाय स्वच्छता राखली जाणार नाही. स्वच्छतागृह एखाद्या संस्थेकडे सोपवल्यानंतर देखभाल दुरुस्तीसाठी आकारल्या जाणा-या शुल्कांचेही नियमन केले पाहिजे, त्याचाही प्रस्तावात अभ्यासपूर्ण पद्धतीने समावेश करावा, असे पवार म्हणाले.