आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Toll Agitation News In Marathi, Political Issue, Divyamarathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विश्लेषण: युतीचा तोटा, काँग्रेसचा लाभ; आघाडीच्या खेळीने विरोधकांची कोंडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- टोलच्या आंदोलनात बुधवारी तोंडघशी पडलेले मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या काही मागण्या मान्य करत काँग्रेस-राष्ट्रवादीने त्यांना सावरून घेतले आणि या आंदोलनात त्यांचा विजय झाल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. टोलमुक्तीची घोषणा करत निवडणुकांचे रणशिंग फुंकणार्‍या भाजप-शिवसेना महायुतीच्या शिडातील हवाच काँग्रेस आघाडीने ही खेळी करून काढून घेतली आहे. त्यामुळे युतीची आता कोंडी झाली आहे.

टोलविरोधात जनतेच्या मनातील खदखद सर्वप्रथम ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारदरबारी मांडली. पुढे निवडणुकीच्या तोंडावर सरकारविरुद्ध विरोधकांना यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनीही टोलविरोधच रेटला. मराठी अस्मितेच्या मुद्दय़ातील हवा ओसरल्याने राज यांनाही टोलचीच मदत घ्यावी लागली. यासाठी पक्ष कार्यकर्त्यांमार्फत त्यांनी एक सर्वेक्षण करून घेतले. मुख्यमंत्र्यांसोबत झालेली चर्चा पत्रकारांना कळावी म्हणून त्यांना सोबत घेऊन जाणार्‍या राज यांनी त्यांच्या पक्षाने केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष मात्र अद्याप जाहीर केलेले नाहीत, हे विशेष.

राज यांनी 2009च्या लोकसभा निवडणुकीत युतीच्या मतांना खिंडार पाडत काँग्रेस आघाडीच्या यशाला हातभार लावला. आजवरच्या सर्व विधान परिषद, राज्यसभा निवडणुकांतही त्यांनी काँग्रेस आघाडीला अप्रत्यक्ष मदतच केली. शिवसेनेनेही सुरुवातीच्या काळात काँग्रेसला अशीच मदत केली होती. तेव्हा शिवसेनेच्या मदतीने काँग्रेसने कम्युनिस्टांना संपवले आणि आता मनसेच्या मदतीने शिवसेना-भाजप युतीचे शिरकाण करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. टोलच्या मुद्दय़ावरून राजकीय आणि माध्यमातील टीआरपी वाढल्याने राज यांनी पुन्हा एकदा महायुतीचे नुकसान करण्याची क्षमता मिळवली आहे. त्यामुळे काँग्रेस आघाडी असो की मनसे दोघांनाही राजकीय फायद्याचा टोल वसूल करणे शक्य होणार आहे.

मोदीचा चहा थंडावला
आम आदमी पक्षाला हवा देऊन भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची हवा संपविणार्‍या काँग्रेसच्या टोल-खेळीमागे मोदी फॅक्टरही होता. मोदी हे 12 फेब्रुवारीस चहा पित चर्चा करतील, अशी घोषणा त्यांनी केली असताना तोच दिवस राज यांनी निवडला. राजला देशभर टीआरपी आहे. संघाचे मुख्यालय असलेल्या महाराष्ट्रात तर त्या दिवशी मोदींच्या चहापानाचे काय झाले, मोदी काय बोलले याची दखल जवळपास कुणीच घेतली नाही. जिकडे तिकडे राजचीच हवा आणि चर्चा होती. त्यामुळे केजरीवालसोबतच राजला ही वापरून मोदींना आवरायची ही काँग्रेसची खेळी असल्याचे संकेत आहेत.

राजआडून भाजपची कोंडी, काँग्रेसचे मतांचे गणित असे
महायुतीने राज म्हणजे काँग्रेसचे हस्तक असल्याचा प्रचार सुरू केला आहे. यामुळे राजची महायुतीच्या तंबूत दाखल होण्याची शक्यता जवळपास शून्य आहे. काँग्रेसलाही हेच हवे होते. शिवाय टोल सुधारणेचे श्रेय राजच्या पारड्यात टाकून विरोधकांचे या मुद्दय़ावरील अपयश अधोरेखित करायचे होते. टोल मुख्यत: महानगरातील उच्च् मध्यमवर्गांचा प्रश्न आहे आणि या वर्गात मनसेचा मोठा मतदार आहे. त्यामुळे र्शेय मनसेला गेले तर हीच मतपेढी असलेल्या भाजपचीही निवडणुकीत कोंडी होऊ शकते, हे गणितही यामागे आहे.