आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Toll Booth Policy Today Discusse In Minister Council Meeting

आज होणा-या मंत्रिमंडळ बैठकीत होणार टोल धोरणावर चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टोलवरून राज्यात राजकारण पेटल्याने बुधवारच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत चर्चा होऊन टोल धोरणाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी रात्री यासंदर्भात बैठक घेऊन संबंधित अधिका-यांशी चर्चा केली.
नव्या धोरणात किलोमीटरनुसार टोल आकारणीचा प्रस्ताव आहे. सध्या राज्यात टोलविरोधी वातावरण असल्याने टोल धोरणाच्या मसुद्यावर अखेरचा हात फिरवला जात आहे. हे धोरण लवकर लागू करावे यासाठी मुख्यमंत्री आग्रही असल्याने याबाबतचा निर्णय अपेक्षित आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोरील प्रस्तावांच्या यादीत मुंबईतील वीज कपातीचा मुद्दा नसला तरी काँग्रेसच्या खासदारांचे आंदोलन आणि मुंबईतल्या वीजकपातीबाबत मुख्यमंत्री आग्रही असल्याने ऐनवेळी विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे. सोमवारी मुख्यमंत्र्यांनी ऊर्जा विभागाच्या अधिका-यांची एक बैठक घेऊन यासंदर्भात चर्चा केली होती.
मुंबईतही वीज दर कपात
मुंबईत वीज दरात कपात करताना महावितरण आणि बेस्ट बरोबरच रिलायन्स आणि टाटा या खासगी कंपन्यांचाही विचार करावा लागणार आहे. मुंबईत शहर आणि उपनगरात सरसकट वीज कपात लागू केल्यास या खासगी कंपन्यांना राज्य सरकारमार्फत कपातीची रक्कम अदा करावी लागेल. त्यामुळे मुंबईतील वीज दर कपातीचा मोठा आर्थिक भुर्दंड सरकारला सोसावा लागणार आहे.
नागपूर मेट्रोला मंजुरी ?
शहरी भागातील निराधार व विधवांच्या लग्नासाठी असलेल्या शुभमंगल विवाह योजनेच्या आर्थिक तरतुदीत वाढ यासह नागपूर मेट्रो प्रकल्पालाही मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. नक्षलग्रस्त भागात नेमणुका होणा-या सरकारी अधिकारी आणि कर्मचा-यांच्या विशेष सवलतीत वाढ करण्याचा प्रस्तावही चर्चेला येणार आहे. भरडधान्याच्या आधारभूत किमतीत वाढ करण्याबाबतचा प्रस्तावही मंत्रिमंडळाच्या अजेंड्यावर आहे.