आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Toll free Maharashtra A Concept, Not Poll Promise: Fadnavis

जाहीरनाम्यात टोलमुक्तीचे आश्वासन दिलेच नाही, फडणवीसांचे घूमजाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टोलमुक्त महाराष्ट्राचे आश्वासन आमच्या जाहीरनाम्यात कधीच नव्हते. आम्ही फक्त टोलमुक्त महाराष्ट्राचा संकल्प केला होता. आणि तो पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असल्याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केला. टोलबाबत मुख्यमंत्र्यांच्या या खुलाशामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे, तर नव्या सरकारची ही बनवाबनवी असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

टोलमुक्त महाराष्ट्राचे आश्वासन भाजपने कधीच दिले नव्हते किंवा आमच्या निवडणूक जाहीरनाम्यात त्या मुद्द्याचा समावेशही नव्हता, अशी भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोलमुक्तीच्या मुद्द्याला बगल दिली आहे. उलट "टोलमुक्त महाराष्ट्र' ही फक्त आमची संकल्पना असून त्यादृष्टीने आमचे काम सुरू आहे. आधीच्या सरकारने राज्यभरात अनेक टोल प्रकल्पांची कंत्राटे देताना ती रद्द करण्याची तरतूदच ठेवल्याने टोलमुक्तीच्या प्रक्रियेत अनेक अडचणी येत आहेत. राज्याच्या जनतेला जाचक टोलमधून मुक्ती मिळावी ही आमची भूमिका आहेच. त्यामुळे आधीच्या सरकारने केलेल्या कंत्राटदारधार्जिण्या करारांची आम्ही सध्या चौकशी करत आहोत आणि शक्य तितक्या लवकर एक नवे टोल धोरण आमचे सरकार आणणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

टोलबाबत मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या नव्या भूमिकेवर विरोधकांनी मात्र जोरदार हल्ला केला. हे सरकार स्व. गोपीनाथ मुंडेंनी जनतेल्या दिलेल्या टोलमुक्तीच्या आश्वासनाचे पालन करणार आहे की नाही, असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

हेतर घूमजाव सरकार : मलिक
हेघूमजाव सरकार असून टोल, एलबीटी यांसारख्या मुद्द्यांवर यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचाच यांना विसर पडला आहे. जनता हे सर्व पाहत असल्याचे नवाब मलिक यांनी या वेळी सांगितले. दरम्यान, फडणवीस सरकारला शनिवारी शंभर दिवस पूर्ण झाल्यानिमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसांमधील कामांचा धावता आढावा घेतला.

खडसे म्हणतात, "तुम्हाला पाहून घेतो'...
आजच्यापत्रकार परिषदेत मुख्यमंत्री आणि खडसे शेजारी- शेजारी बसले होते. दोघांच्या वादाबाबत शेवटी पत्रकारांनी छेडले असता मुख्यमंत्री म्हणाले की, "आमच्यात कोणताही वाद नाही. त्या दिवशी आम्ही सह्याद्रीवर एकत्र बसलो, चहा घेतला, गप्पाही मारल्या आणि त्यानंतर राज्यापाल येणार म्हणून त्यांच्या स्वागतासाठी आम्ही बाहेर गेलो. तर एका वर्तमानपत्राने फोटो काढून तो छापला आणि लिहिले की, शेजारी उभे असूनही मुख्यमंत्री आणि खडसे यांनी एकमेकांकडे पाहिलेही नाही.' मुख्यमंत्र्यांच्या या खुलाशावर शेजारी बसलेले खडसे मुख्यमंत्र्यांकडे पाहत पत्रकारांना उद्देशून म्हणाले की, "आता पाहून घेतो..' खडसेंच्या या वाक्याकडे लक्ष वेधत मुख्यमंत्र्यांच्या दुसर्‍या बाजूला बसलेल्या रावतेंनी म्हटले की, "पाहा, ते म्हणत आहेत तुम्हाला पाहून घेतो..' रावतेंच्या या वाक्यावर सभागृहात एकच हशा पिकला. मुख्यमंत्री आणि खडसेही त्यात सामील झाले.