आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोल बैठकीला मुख्यमंत्र्यांची दांडी; बैठक तोडग्याविना संपली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- टोलविरोधी आंदोलन तीव्र करणार्‍या कोल्हापुरातील कृती समितीसोबत सोमवारी मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीस मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अनुपस्थित राहिले. सार्वजनिक बांधकाम मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सरकार व कृती समिती दोघेही आपापल्या भूमिकांवर ठाम राहिल्याने कोणताही तोडगा निघाला नाही. कोल्हापूर जिल्हय़ातील मंत्री सतेज पाटील व हसन मुर्शीफ यांनी मात्र बैठकीत मौन बाळगल्याने कृती समितीतून संताप व्यक्त होत आहे.

कोल्हापूर शहरात ‘बीओटी’ तत्त्वावर उभारण्यात आलेल्या अंतर्गत रस्त्यांचा टोल भरणार नाही, असा आक्रमक पवित्रा टोलविरोधी कृती समितीने घेतला आहे. मात्र सरकारने टोलवसुली होणारच असल्याचे जाहीर केल्याने कोल्हापुरात अनेकदा हिंसक आंदोलने झाले. टोलविरोधी कृती समितीत सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते सहभागी असल्याने सरकारची या प्रकरणात चांगलीच गोची झाली आहे. या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

सार्वजनिक बांधकाम मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यासह शेकापचे ज्येष्ठ आमदार प्रा. एन. डी. पाटील, शाहू महाराज, कोल्हापूरच्या महापौर प्रतिभा नाईकनवरे, पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, कामगार मंत्री हसन मुर्शीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार जयवंतराव आवळे, खासदार राजू शेट्टी, आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह अनेक आमदार सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीस उपस्थित होते. टोलविरोधी कृती समितीच्या सदस्यांनी या वेळी मंत्र्यांसमोर आक्रमक बाजू मांडत टोल भरणार नसल्याचा पुनरुच्चार केला. या वेळी उपस्थित असलेले कोल्हापूरचेच दोन मंत्री हसन मुर्शीफ आणि सतेज पाटील यांनी मात्र शब्दही उच्चारला नसल्याचे समजते. त्यांच्या मौनव्रताबद्दल कृती समितीमधील सदस्यांनी संताप व्यक्त केला.

421 कोटी आधी द्या, मग टोल माफ करतो
‘एमएसआरडीसी’ ची स्थापना नफा मिळवण्यासाठी करण्यात आलेली आहे. कोल्हापुरातील रस्ते बांधणीसाठी आजवर खर्च करण्यात आलेले 421 कोटी रुपये सरकारने या मंडळाला द्यावे, त्यानंतर कोल्हापूरकरांना टोल माफ होऊ शकतो.
-जयदत्त क्षीरसागर, बांधकाम मंत्री