आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किलोमीटरच्या आधारावर ठरणार टोलची किंमत !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यात पेटलेल्या टोलविरोधी आंदोलनांमुळे नव्या टोल धोरणाच्या मसुदा बनवण्याच्या कामाला वेग आला आहे. नव्या धोरणात प्रकल्पाच्या किमतीवर नव्हे तर किलोमीटरच्या आधारावर टोल आकारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे टोल धोरणात अधिक पारदर्शकता येण्याची आशा आहे.

सध्या राज्यातील एकूण 167 टोल नाक्यांवर वसुली सुरू आहे. सरसकट त्या रस्त्याच्या कामासाठी आलेला खर्च आणि तो वसूल होईपर्यंत त्यावर प्रकल्प राबवणार्‍या कंपनीला भरावे लागणारे व्याज यांच्या आधारावर टोल वसुलीची रक्कम निश्चित केली आहे. मात्र आता नव्या धोरणानुसार त्यात बदल केले जातील.

मात्र धोरण लागू झाल्यानंतर उभारण्यात येणार्‍या नव्या प्रकल्पांनाच हा नियम लागू होणार आहे. येत्या आठवड्यात होणार्‍या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत नवे टोल धोरण चर्चेला येणार आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्री आग्रही : टोलविरोधात मनसेने दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सरकारच्या धोरणावर ताशेरे ओढले जाण्याची शक्यता गृहीत धरूनच हे धोरण लवकर मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री आग्रही असल्याचेही कळते. तसेच एसटी बसेसनाही टोल आकारणीतून वगळण्याचा निर्णय होणार आहे.

ऑडिटला विरोधच : टोल मुद्दय़ाचा फटका निवडणुकीत बसू नये यासाठी टोल नाक्यांचे ऑडिट करण्याची मागणी सत्ताधार्‍यांकडूनच होत आहे. मात्र ऑडिट केल्यास प्रकल्पांना वित्त पुरवठा करणार्‍या संस्था राज्य सरकारच्या प्रकल्पांना पैसा पुरवताना हात आखडता घेतील आणि भविष्यातल्या प्रकल्पांना फटका बसेल, हा धोका लक्षात आल्याने ऑडिटबाबत मुख्यमंत्रीच अनुकूल नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.