आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागावाटपावरून अाघाडीत रस्सीखेच; नाशिक, अमरावतीचे उमेदवार काँग्रेसकडून जाहीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठी डिसेंबरमध्ये निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी जागा वाटपावरून दोन बैठका होऊनही काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये कोणताही तोडगा निघू शकला नाही. काँग्रेसने अधिक जागा मिळाव्यात यासाठी आग्रह धरला आहे. विशेष म्हणजे ज्या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत त्या तीन जागांवरही काँग्रेसने दावा सांगितला आहे. त्यामुळे जागा वाटपाची चर्चा पुढे सरकू शकली नाही.

विधान परिषदेच्या ११ जागांपैकी पाच जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले होते, तर दोन जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून काँग्रेसचे अमर राजूरकर हे विजयी झाले होते, तर नाशिक पदवीधर मतदारसंघात डॉ. सुधीर तांबे विजयी झाले होते. या दोन्ही जागांवर काँग्रेस पुन्हा उमेदवार देणार आहे.
मंगळवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत काँग्रेसने राष्ट्रवादीच्या ताब्यातील भंडारा-गोंदिया, यवतमाळ आणि सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाची मागणी केली आहे. भंडारा-गोंदियाबाबत काँग्रेस आग्रही असून तेथे विद्यमान आमदार गोपालदास अग्रवाल यांचे पुत्र निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. येथील परिस्थिती पाहता त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली तरी त्यांचा विजय होईल, असा काँग्रेसने दावा केला आहे.
सातारा-सांगली स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघ काँग्रेसलाच मिळावा यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आग्रही आहेत. या मतदारसंघाबाबत पक्षाने अजिबात तडजोड करू नये, असेही चव्हाण यांनी सांगितले आहे. या ठिकाणी अापला उमेदवार देण्याची तयारीही त्यांनी केली आहे. मात्र, काँग्रेसची ही मागणी राष्ट्रवादीने साफ शब्दात फेटाळून लावली आहे. भंडारा- गोंदियाची जागा अापल्याच पक्षाला मिळावी यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिष्ठा पणाला लावली अाहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेला समर्थन देत काेणत्याही परिस्थितीत अापला पक्ष ही जागा साेडणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. त्यामुळे अाघाडीतील जागावाटपाबाबत मंगळवारच्या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. या बैठकीला काँग्रेसकडून विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे उपस्थित होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे
उपस्थित होते. काँग्रेसकडून खोडके, तांबे अमरावती पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसने संजय खोडके यांना तर नाशिक पदवीधरमधून आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली.

निवृत्त होत असलेले विधान परिषद आमदार
अमर राजूरकर, नांदेड, काँग्रेस
प्रभाकर घारगे, सांगली-सातारा, राष्ट्रवादी
संदीप बाजोरिया, यवतमाळ, राष्ट्रवादी
राजेंद्र जैन, भंडारा-गोंदिया, राष्ट्रवादी
अनिल भोसले, पुणे, राष्ट्रवादी
गुरुमुखदास जगवाणी, जळगाव, भाजप
डॉ. सुधीर तांबे, नाशिक पदवीधर, काँग्रेस
डॉ. रणजित पाटील, अमरावती विभाग, भाजप
विक्रम काळे, मराठवाडा शिक्षक मतदारसंघ, राष्ट्रवादी
नागो गाणार, नागपूर शिक्षक, अपक्ष
रामनाथ मोते, कोकण शिक्षक मतदारसंघ, भाजप
बातम्या आणखी आहेत...