आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रूफटाॅप हाॅटेलमुळे पर्यटन व्यवसाय, राेजगार वाढण्याची अाशा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईत रूफटाॅफ म्हणजेच गच्चीवरील हाॅटेल्सना महापालिकेने नुकताच हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक राजधानीत या हाॅटेल इंडस्ट्रीला चालना मिळणार असून १० लाख नवे रोजगार निर्माण होतील. सिंगापूर, हाँगकाँगप्रमाणे ‘अंडर द स्काय’ खानपानाची पर्वणी उपलब्ध होणार होईल तसेच मुंबईच्या पर्यटन व्यवसायात वाढ होईल, असा अंदाज हाॅटेल जगताकडून व्यक्त केला जात आहे.   

सिंगापूर तसेच अन्य देशांत रुफटाॅफ हाॅटेल्स संकल्पना आहे. मुंबई मनपाने २०१४ मध्ये यासंदर्भातले धाेरण बनवले. मात्र, भाजप अाणि काँग्रेसच्या विरोधामुळे ते थंड बस्त्यात होते. बुधवारी पालिका आयुक्तांनी आपल्या अधिकारात त्यास मंजुरी िदली. मुंबईत २ लाख ७३ हजार ७५५ व्यावसायिक आस्थापना, १ हजार ५८१ निवासगृहे, १२ हजार ९४५ उपाहारगृहे अाणि ७९४ चित्र-नाट्यगृहे अाहेत. निवासी नसलेल्या सर्व व्यावसायिक इमारतींवर आता रूफटाॅप हाॅटेल्स सुरू करणे शक्य होणार आहे, अशी माहिती पालिकेतील अधिकाऱ्याने िदली.   
 
मुंबईतील हाॅटेल उद्योगात आजमितीस सुमारे २५ लाख रोजगार आहेत. रुफटाॅप हाॅटेल्समुळे या रोजगारात ३० टक्के वाढ होईल. संलग्न रोजगाराचा विचार केल्यास मुंबईत १० लाख नवे रोजगार निर्माण होतील, असे हाॅटेल व्यावसायिकांच्या आहार संघटनेच्या आदर्श शेट्टी यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.   
 
मागच्या पाच वर्षांत मुंबईतल्या स्काय लाइनमध्ये मोठा बदल झाला आहे. परळसारख्या दक्षिण मुंबईतील भागात गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या आहेत. आकाशाला भिडणाऱ्या या इमारतीच्या गच्चीवर पर्यटकांना नवीन अॅव्हेन्यू ओपन होणार आहे, असे हाॅटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे. मुंबईत पंचतारांकित हाॅटेलच्या गच्चीवर सध्या अनेक स्काय लाउंज आहेत. मात्र, तेथे केवळ मद्यसेवा पुरवली जाते. किचन तळघरात असते. रूफटाॅप हाॅटेल्समुळे ‘अंडर द स्काय’ खाण्यापिण्याची लज्जत लुटता येणार आहे. तसेच मुंबईचा वेगळा नजराही अवकाशातून पाहता येणार आहे. पर्यटकांसाठी रूफटाॅप हाॅटेल्स ही अनोखी पर्वणी ठरणार आहे.  परळमध्ये लहान जागेला लाखांत भाडे देण्यापेक्षा रूफटाॅपच्या हाॅटेल्समध्ये मोठी जागा उपलब्ध होईल, तसेच नरिमन पॉइंट ते मलबार हिल या क्वीन नेकलेसच्या (राणीचा हार) समुद्र िकनारी रूफटाॅपच्या हाॅटेल्सना मोठा स्कोप असणार आहे. त्यामुळे मुंबईतली हाॅटेल लाॅबी रूफटाॅप धोरण मंजूर केल्याबद्दल मनपातील सत्ताधारी शिवसेनेवर जाम खुश आहे. 
 
कशी असतील हाॅटेल्स?
व्यावसायिक इमारती, लॉजिंग- बोर्डिंगची व्यवस्था असलेली हॉटेल्स, मॉलच्या टेरेस इत्यादींवर रूफटाॅप हाॅटेल सुरू करता येतील. टेरेसवर मायक्रोवेव्ह आणि इंडक्शन कुकिंगलाच परवानगी असेल. छत्री, पत्रे, मान्सून शेड टाकून टेरेस झाकता येणार नाही.   
 
शिवसेनेची बाजी    
आदित्य ठाकरे हे रूफटाॅप हाॅटेल्स धोरणाबाबत आग्रही होते. मात्र, भाजपने सुधार समितीत हा प्रस्ताव अडवला होता. शेवटी शिवसेना नेतृत्वाने रूफटाॅप हाॅटेल धोरण सभागृहात न आणता आयुक्तांच्या अधिकारात मंजूर करून घेतले. परिणामी भाजप-काँग्रेसचा डाव उधळला गेला.
बातम्या आणखी आहेत...