आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटनाला चला; हॉटेल नको, कॅराव्हॅनमध्ये राहा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - समुद्रिकनारे, गडकिल्ल्यांसारख्या पर्यटनाच्या ठिकाणी ‘कॅराव्हॅन’मध्ये राहण्याचा अनोखा अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे. राज्यातील ही पहिलीवहिली संकल्पना पर्यटनाला एक नवा आयाम देणारी ठरणार आहे. नाशिकमधील तरुण उद्योजक हेरंब सहस्रबुद्धे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या कॅरास्टे या उपक्रमामध्ये लंडन येथून दोन सेकंड हँड कॅराव्हॅन आयात करण्यात आल्या आहेत. सध्या प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबवण्यात येणार असून पर्यटकांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर देशभरात ‘कॅरास्टे’ची साखळी तयार करण्याचा त्यांचा मानस आहे.

अलीकडच्या काळात इको, अॅडव्हेंचर, वाइल्डलाइफ, पिलग्रिम टुरिझमला चांगली पसंती मिळू लागली आहे. यामध्ये बर्‍याचदा दुर्गम भाग, जंगल, सागरी किनार्‍यावर पर्यटकांबरोबरच छायाचित्रकार, अभ्यासकांना राहावे लागते. या ठिकाणी कायमस्वरूपी बांधकाम करणे शक्य नसते. परिणामी, त्यांना हॉटेलमध्ये राहावे लागते. ‘कॅरास्टे’मुळे त्यांना त्याच ठिकाणी राहता येईल. त्यामुळे स्थानिक तसेच कृषी पर्यटनाबरोबरच त्या भागातील महसूल वाढ आणि रोजगाराला चालना मिळण्यास मदत होऊ शकेल, असे कॅराव्हॅन टुरिझमच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल "दिव्य मराठी'ला माहिती देताना हेरंब सहस्रबुद्धे यांनी सांगितले. लंडनमध्ये झालेल्या ‘प्रवासी भारतीय दिवस परिषदेमध्ये ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेचे सादरीकरण करण्यात आले.

देशात ‘कॅराव्हॅन पार्क टुरिझम’ला चालना देण्यासाठी विशेष धोरण तयार करण्यात आले आहे. नोव्हेंबरमध्ये गुजरातमध्ये झालेल्या प्रवासी भारतीय दिवस परिषदेतही ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’अंतर्गत महाराष्ट्रातील इनबाउंड टुरिझम वाढवण्याबाबत चर्चा झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एमटीडीसीचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. या परिषदेत हेरंब यांनी ‘कॅरास्टे’ची संकल्पना सादर केली होती.

हेरंब यांच्या टँजेंट कन्सेप्ट कंपनीमार्फत सुरू करण्यात आलेल्या ‘कॅरास्टे’ पर्यटन उपक्रमामध्ये सेकंडहँड मोटारींच्या विक्री व्यवसायात आघाडीवर असलेले नाशिकमधील पॉप्युलर कार्सचे प्रफुल्ल बोंडे हे वित्तीय भागीदार आहेत. कॅराव्हॅन पर्यटनासाठी ठाणे येथील ट्रॅव्हलपॅक्स हॉलिडे कंपनीबरोबरदेखील करार करण्यात आला आहे. पर्यटनाला आणखी चालना देण्यासाठी कॅराव्हॅनची विक्री करण्यात येणार आहे.

मिळालेल्या सुविधा
मोठ्यांसाठी डबलबेड, मुलांसाठी बंक बेड (एकावर एक राहणारे), गॅस शेगडी, ओव्हन, फ्रिज, वॉर्डरोब, एअरकंडिशन, म्युझिक सिस्टिम, टॉयलेट, बाथरूम इत्यादी

पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र : कोकण, कुंभमेळा, पंढरीची वारी, लोणार, कास पठार, ताडोबा. महत्त्वाचे गड-किल्ले, अजिंठा-वेरूळ लेणी, वाइन टुरिझम.
दुसर्‍या टप्प्यात विस्तार : केरळ, गोवा, गुजरात, कर्नाटक, ओडिशा. ही राज्ये.

कॅराव्हॅन आहे तरी काय ?
थोडक्यात चालते-फिरते घर.. मोटारीच्या मागे कॅराव्हॅन जोडून पर्यटनाला जाण्याचा हा प्रकार विदेशात लोकप्रिय आहे; परंतु ‘कॅरास्टे’ मोटारीला जोडता एकाच ठिकाणी उभ्या राहून निसर्गाचा आनंद घेता येऊ शकेल. पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवा देण्यासाठी कर्मचार्‍यांना योग्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.