आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंधुदुर्ग: करुळ, भुईबावडा घाटात पर्यटकांचा ओघ; दरवर्षी संख्‍येत लक्षणीय वाढ, मात्र सुविधा अपुऱ्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैभववाडी - निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या निसर्गरम्य करुळ घाटात पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. करुळ घाट मार्गाची पर्यटकांवर नेहमीच मोहिनी असते. निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद घेण्‍यासाठी पर्यटक नेहमी मोठ्या संख्‍येने इथे येत असतात.
 
मात्र या ठिकाणी पर्यटकांसाठी पुरेशा प्रमाणात सोयी सुविधा उपलब्‍ध नाहीत. पर्यटकांना पर्यटनात्मक सोयी सुविधा पुरविण्‍यासाठी शासनाने ठोस पाउले उचलणे आवश्‍यक आहे. तसेच घाटमार्गाचा विकास पर्यटनाच्या दृष्टिकोनातून होणे महत्त्वाचे आहे. 

सिंधुदुर्गमध्‍ये दरवर्षी पर्यटकांच्‍या संख्‍येत मोठी वाढ
सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाल्यानंतर करुळ घाटमार्गाला अधिक महत्त्व आले आहे. घाटाच्या वाटेचा थाट, उंच उंच कडे, दरीत दिसणारी कौलारू घरे, दरीतून उसळी घेणारे दाट धुके, ठिकठिकाणी वावरणाऱ्या माकडांचा कळप पाहून पर्यटकांचे निसर्गरम्य घाटावरील प्रेम अधिक घट्ट होत आहे. वैभववाडी तालुक्याला निसर्गाने भरभरून दिले आहे. सालवा डोंगर,नापणे धबधबा,करुळ ऐनारी गुहा यासारख्या नैसर्गिक खजिना लाभला आहे. सुट्टीमध्ये पर्यटक जिल्ह्यातील या पर्यटन स्थळांना भेट देवून मनमुराद आनंद घेत आहेत. विशेष म्‍हणजे पश्चिम महाराष्ट्र भागातून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दरवर्षी मोठी वाढ होत आहे.  

पर्यटनासाठी घाटरस्‍ते महत्‍त्‍वाचे 
पर्यटन स्थळांचे सुशोभिकरण, तीर्थक्षेत्रांचा विकास, धबधबे याठिकाणी शासनाकडून निधी खर्च केला जात आहे. मात्र तालुक्यातील घाटरस्ते पर्यटनाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाची भूमिका बजावत असून ते अजूनही दुर्लक्षित आहेत. करुळ, भुईबावडा हे दोन्ही घाट १९६८ साली सुरू झाले आहेत. दोन्ही घाटाचा विचार करता करुळ घाटमार्गे रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
 
गगनबावडा खिंडीत पर्यटकांचे आगमन होताच होणारे हवामानातील बदल, घोंगावणारा वारा व दूरवर दिसणारा सिंधुदुर्ग दर्शनाने पर्यटक सुरुवातीला भारावून जात आहेत. तेथून काही अंतरावर आलेल्या यू आकाराच्या वळणावर मात्र पर्यटकांना गर्दीचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणाहून ५०० फूट खोल असलेली दरी, उंच शिखरावर भाविकांचे श्रध्दास्थान असलेला किल्ले गगनगड, गगनगिरी महाराजांच्या गगनगडाचे दर्शन घेवून पर्यटक पुढील भ्रमंती करत आहेत. 

पर्यटन केंद्र, पिण्‍याच्‍या पाण्‍याची सोय उपलब्‍ध करुन देणे गरजेचे 
घाटमार्गात संबंधित विभागाकडून पर्यटन थांबा बनविण्यात आला आहे. रस्त्याच्या कडेला दरीकडच्या बाजूस लोखंडी पाईपने अर्धवर्तुळाकार जागा बनविण्यात आल्या आहेत.या स्थळावर पर्यटकांची मोठी गर्दी दिसू लागली आहे. पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेता यापूर्वी घाटमार्गाचे रुंदीकरण करण्यात आले आहे.
 
पावसाळ्यात पडणाऱ्या दरडी त्वरित हटविण्याचे काम सा.बां.कडून केले जाते. संरक्षण कठड्यांची पडझड मोठ्या प्रमाणात होत असल्याने तात्पुरता क्रँश बँरिअरचा वापर घाटात करण्यात आला आहे.इ तके असूनदेखील पर्यटकांना हव्याशा वाटणाऱ्या सोयी सुविधांचा याठिकाणी अभाव असल्याचे दिसत आहे. पर्यटन केंद्र, पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. 
 
पांडवकालीन गुहेकडे दुर्लक्ष 
या घाटमार्गादरम्यान पांडवकालीन गुहेचा शोध लावण्यात आला आहे. पुरातत्व विभागाने या गुहेकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. गुहेकडे जाणाऱ्या रस्त्याची डागडुजी केल्यास पर्यटक गुहेपर्यंत सहज पोहोचू शकतील. संबंधित विभागाने संपूर्ण घाटमार्गाचे फेरसर्वेक्षण करून घाटमार्ग सुरळीत करणे अत्यंत गरजेचे आहे.
बातम्या आणखी आहेत...