आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय पर्यटकांसाठी मलेशियाच्या पायघड्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारत हा विकसनशील देश असून आर्थिक सुबत्ता असल्याने येथील पर्यटकांना बॉलीवूडच्या माध्यमातून जास्तीत जास्त आकर्षित करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत, अशी माहिती मलेशियाच्या पर्यटन विभागाच्या अध्यक्षा नाग येन येन यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

येन येन यांनी सांगितले की, भारतासारखा आम्हाला हजारो वर्षांचा इतिहास नाही. या देशासारखी पर्यटनस्थळेही आमच्याकडे नाहीत. आमचा देश तरुण आहे. त्यामुळे आहे त्या गोष्टीतूनच जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असतो. पैशाचा पुरेपूर मोबदला देणार्‍या पहिल्या दहा देशांमध्ये आमचा क्रमांक चौथा लागतो, त्याचे कारण आम्ही पर्यटनावर दिलेला भर हे आहे. आमच्या देशात 60 टक्के मुस्लिम, 25 टक्के अन्य म्हणजे ख्रिश्चन, बौद्ध वगैरे असून 10 टक्के हिंदू आहेत. कोणत्याही देशात स्थिरता आणि शांती असेल तर तेथे पर्यटकांची संख्या वाढते. आमच्या देशात या दोन्ही गोष्टी आहेत. तसेच आम्ही पर्यटनावर जास्त लक्ष देत असल्याने ही आमची राष्ट्रीय मोहीम होते. पर्यटकाला कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना आम्ही टॅक्सी ड्रायव्हरपासून मॉलमधील सेल्समनपर्यंत सगळ्यांना दिल्या आहेत, असे त्या म्हणाल्या.

चांगली पर्यटनस्थळे असूनही भारतात दुर्लक्ष
मलेशिया मुंबईपेक्षा स्वस्त आहे. मुंबई किती महाग आहे हे मला या दोन दिवसांत कळले. केवळ महागच नव्हे तर मुंबईत प्रचंड गर्दीही असते. रस्ता ओलांडण्यास मला खूप वेळ लागला, परंतु खरे पाहिले तर भारतात खूपच चांगली पर्यटन स्थळे आहेत परंतु कोणीही त्याकडे लक्ष देत नाहीत. बॉलीवूडसारखा यशस्वी ब्रॅन्ड असताना त्याचा योग्यरीत्या वापर केला जात नाही. आम्ही आमच्या देशात चित्रीकरणासाठी विशेष सुविधा पुरवण्याबरोबरच इमिग्रेशन, कस्टम, पोलिस आणि चित्रीकरण स्थळाची संपूर्ण सुविधा मलेशिया टूरिजम उपलब्ध करून देणार असल्याची माहितीही येन यांनी दिली.

साडेतीन कोटी पर्यटकांचे लक्ष्य
2020 पर्यंत तीन कोटी 60 लाख पर्यटक मलेशियात आणण्याची आम्ही योजना आखली असून त्यादृष्टीने हॉटेल्सपासून सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. पर्यटनच फक्त देशाचे उत्पन्न वाढवू शकतो म्हणून आम्ही त्याकडे जास्त लक्ष देत असून 2020 पर्यंत 168 बिलयिन रिंगेट (मलेशियन चलन) पर्यटनाच्या माध्यमातून आम्हाला मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.