आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tourist Mela In Maharashtra In The Last Week Of This Month

राज्यात महिनाअखेरीस भरणार पर्यटनाचा ‘कुंभमेळा’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील पर्यटन क्षेत्राचा राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचार करण्यासाठी आणि पर्यटन क्षेत्रातील राज्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी महाराष्ट्रात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय पर्यटन व्यापार मेळा मुंबईतील गोरेगावात (पूर्व) आयोजित करण्यात आला आहे. २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या या मेळ्यात ३० हून अधिक देशांतील २५० पर्यटन कंपन्या, दीड हजाराहून अधिक ट्रॅव्हल एजंट्स यांची उपस्थिती असेल. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद‌्घाटन होणार आहे.

बिझनेस टू बिझनेस (बी २ बी) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मेळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्यासाठी खास निमंत्रित करण्यात आलेल्या पर्यटन कंपन्या आणि आंतरराष्ट्रीय माध्यम प्रतिनिधी यांचा प्रवास, निवास आणि खाण्यापिण्याचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार आहे. केवळ निमंत्रित कंपन्या वा व्यावसायिकांसाठी व माध्यमांसाठी असलेल्या (होस्टेड बायर- सेलर मीट) या मेळ्यात पर्यटन क्षेत्रातील २० प्रकारांशी संबंधित भारतीय कंपन्या वा संस्थांची दालने असतील. अाजवर अन्य काही राज्यांनी अशा मेळ्याची संकल्पना छोट्या पातळीवर राबवली आहे. मात्र, महाराष्ट्रात अशा संकल्पनेनुसार भरणारा हा पहिलाच व्यापार मेळा असून अन्य राज्यांच्या तुलनेत तो भव्यच असेल.

‘नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, ग्रीस, इस्रायल, जपान, दक्षिण आफ्रिका, सिंगापूर अादी देशांमधील आघाडीच्या पर्यटन कंपन्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. देशातील वा राज्यातील पर्यटकांना घेऊन महाराष्ट्रात येण्यास इच्छुक असलेल्या बड्या कंपन्या, देशातील विविध राज्यांची पर्यटन मंडळे, या कंपन्यांचा देशातील वा विदेशातून महाराष्ट्रातील प्रवासाचे नियोजन करून त्यांना प्रवास-निवास, साहसी पर्यटन आणि आरोग्य सुविधांसाठी पर्यटन यांच्याशी संबंधित कंपन्या यांच्यात या मेळ्यात सखोल चर्चा होईल. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे राज्यातील विविध पर्यटनस्थळांचे तसेच पर्यटन क्षेत्रातील अन्य प्रकारांचे उत्तम सादरीकरण केले जाईल,’ असे पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या सचिव वल्सा नायर सिंह यांनी सांगितले.

काय असेल मेळ्यात?
महाराष्ट्राच्या दालनात राज्यातील अजिंठा-वेरूळ लेणी, लोणार सरोवर, ताडोबा-मेळघाटसारखी राष्ट्रीय उद्याने, तीर्थस्थळे, आरोग्य पर्यटनाशी संबंधित महत्त्वाची रुग्णालये वा संस्था, बॉलीवूड पर्यटन, गिर्यारोहण, गिरीभ्रमण, वनभ्रमण, जल-क्रीडा, हवाई- खेळ असे अॅडव्हेंचर पर्यटन यांची माहिती दिली जाईल. हवाई, रेल्वे, जहाज मार्गे प्रवास घडवणाऱ्या कंपन्या, ट्रॅव्हल एजंट्स, हॉटेल्स आणि रिसॉर्ट, आयुर्वेद आणि हेल्थ स्पासारख्या आरोग्य सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांंची दालने असतील.

पर्यटन वैशिष्ट्ये
{ पर्यटनासाठी महाराष्ट्रातच सर्वाधिक संधी
{ जागतिक वारशाचा दर्जा मिळालेली पाच स्थळे, ९०० गंुफा, ३५० किल्ले,
{ जागतिक दर्जाच्या सागरी किनारपट्ट्या आणि वैविध्यपूर्ण वन्यजीव संपदा

दहा टक्के पर्यटक वाढीची अपेक्षा
राज्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या दरवर्षी ७ ते ८ टक्क्यांनी वाढत असते. ही संख्या १० टक्क्यांनी वाढावी, हे उद्दिष्टही या मेळ्याच्या आयोजनामागे आहे. या मेळ्यात काही महत्त्वाचे करार होण्याची अपेक्षा आहे. देशात पर्यटनासाठी महाराष्ट्र हे सर्वाधिक सुरक्षित राज्य आहे, हे आम्ही विदेशी पर्यटकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे राज्य पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन नैनुतिया यांनी सांगितले.