आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूकबधिरांची भाषा शिकवण्यासाठी प्रशिक्षण, उच्च शिक्षणासाठी प्रयत्न; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मूकबधिरांनाही उच्च शिक्षण घेता यावे यासाठी मूकबधिरांची भाषा येणारे सांकेतिक भाषातज्ज्ञ तयार करण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबत राज्य सरकार विचार करीत अाहे. या प्रशिक्षण केंद्राबाबत सविस्तर योजना सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले. या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी प्रायोगिक तत्त्वावर दोन-तीन विभाग मिळून एक उच्च शिक्षण संस्था सुरू करण्याबाबतही सरकार विचार करीत आहे. 
  
राज्यस्तरीय कर्णबधिर संघटनेच्या विविध मागण्यांसंदर्भात सोमवारी बैठक झाली. या बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, प्रधान सचिव राजगोपाल देवरा, परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुरेंद्रकुमार बागडे, अपंग कल्याण आयुक्त निखिल पाटील आणि संघटनेचे अध्यक्ष मनोज पटवारी अादी उपस्थित होते. 

कर्णबधिर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले, कर्णबधिर व मूकबधिर विद्यार्थ्यांना सर्वसाधारण शाळेमध्येही प्रवेश घेता यावा यासाठी शासनामार्फत अशा शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यात येतील. या शाळांमध्ये सांकेतिक भाषातज्ज्ञांची नेमणूक करण्यात यावी व अशा विद्यार्थ्यांच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी शासकीय विद्यालय सुरू करण्यासंदर्भातील आराखडा सादर करावा. तसेच अभ्यासक्रमामध्ये चौथी भाषा म्हणून सांकेतिक भाषेचा समावेशासंदर्भात विचार करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

बाेगस अपंगांवर कठाेर कारवाई हाेणार
राज्यात अपंगत्वाची बनावट प्रमाणपत्रे घेतल्याचे आढळून आले आहे. अशा बनावट प्रमाणपत्रधारकांविरुद्ध कठोर कारवाई करावी तसेच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिरे आयोजित करून ब्रेन स्टेम इव्होक्ड रिस्पॉन्स ऑडियोमॅट्री चाचणीद्वारे अपंगत्वाची तपासणी करावी, अशा सूचनाही देण्यात अाल्या.
बातम्या आणखी आहेत...