आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता त्वरित, परिवहनमंत्री रावते यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- एसटी कर्मचाऱ्यांचा ५२ कोटी रुपयांचा महागाई भत्ता थकीत आहे. हा भत्ता त्वरित देऊन एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा दिला जाणार आहे. या महिन्यात ३५ कोटी आणि उर्वरित १७ कोटी ऑगस्टपर्यंत देणार असल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. दिवाकर रावते यांनी शनिवारी परिवहन मंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार सांभाळला. त्यानंतर त्यांनी "दिव्य मराठी'शी खास संवाद साधला.

परिवहनमंत्री हा एसटी महामंडळाचा अध्यक्ष असतो, परंतु गेल्या अनेक वर्षांपासून परिवहनमंत्र्यांनी या पदाकडे लक्ष न दिल्याने अध्यक्ष म्हणून नियुक्त केलेली व्यक्तीच एसटीचा कारभार सांभाळत असे. रावते परिवहनमंत्री झाल्यानंतर राज्य सरकारने अध्यादेश काढून परिवहनमंत्रीच एसटी महामंडळाचे अध्यक्ष असतील, असे जाहीर केले, परंतु सध्याचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी सरकारच्या अध्यादेशाविरोधात न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने राज्य सरकारच्या बाजूने निर्णय देत परिवहनमंत्र्यांचे अध्यक्षपद कायम ठेवले. परंतु नियुक्तीसाठी सहा आठवड्यांची स्थगिती दिल्याने दिवाकर रावते अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारू शकले नव्हते. शनिवारी सहा आठवडे पूर्ण झाल्याने त्यांनी पदभार स्वीकारला.
रावते म्हणाले, नियुक्त करण्यात येत असलेल्या अध्यक्षांनी एसटीचा विकास व्हावा याकडे लक्ष दिले नाही. वैयक्तिक स्वार्थापोटी चांगल्या योजना आखण्यात आल्या नाहीत. स्वतःच्या मनाप्रमाणे कंत्राटे देणे, निर्णय घेणे यामुळे एसटी तोट्यात जात होती. आता मी हा पदभार स्वीकारला असून एसटीचा चेहरामोहरा बदलणार आहे. एसटी फायद्यात आणण्याबरोबरच राज्यातील नागरिकांना सुरक्षित एसटी प्रवास पुरवण्याची योजना आम्ही आखली आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता थकीत होता तो त्वरित देण्याचा निर्णय मी आज घेतला आहे.

तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे प्रवाशांना गचके बसतात. यामुळे पाठदुखी, मानदुखीचा त्रास आणि इतर आजार होतात. मात्र, आता प्रत्येक एसटी बसमध्ये एअर सस्पेंशन बसवले जाणार असून प्रवाशांचा हा त्रास कमी होईल आणि अपघातांची संख्याही कमी होईल, असेही दिवाकर रावते म्हणाले.
ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड
ज्येष्ठ नागरिकांच्या ओळखपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे लक्षात आल्याने ज्येष्ठ नागरिकांना एसटी महामंडळाकडूनच स्मार्ट कार्ड देण्यात येणार असल्याचे सांगून दिवाकर रावते म्हणाले, शिवनेरी बसेस आता एसटी महामंडळ स्वतः विकत घेणार आहे. सध्या ज्यांची कंत्राटे आहेत ती पूर्ण झाल्यानंतर शिवनेरी सेवा आम्ही देणार आहोत. शिवनेरीमध्ये खास महिलांकरिता दहा आसने राखीव ठेवण्यात येणार असल्याचेही रावते यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...