मुंबई- वाहतूक सुरक्षिततेचे नियम पाळणारे स्वत:बरोबर इतरांनाही मरणाच्या दारातून वाचवू शकतात, हे मी नुकतेच माझ्या गाडीला झालेल्या अपघातानंतर अनुभवले. माझ्या गाडीला धडक देणारी व्यक्ती मोबाइलवर बोलत असल्याने हा अपघात झाला. पण मी सीटबेल्ट बांधलेला होता. गाड्यांची टक्कर झाल्यानंतर माझ्या गाडीच्या एअरबॅग्ज फुटून बाहेर आल्या आणि मी वाचलो, असे मनोगत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केले.
राज्य सरकारतर्फे सध्या रस्ता सुरक्षा अभियान राबवले जात असून यानिमित्ताने बोलताना रावतेंनी
आपल्याला आलेला अनुभव मांडून जनतेला सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. दादरच्या सेनापती बापट मार्गावरील उड्डाणपुलावरून माझी गाडी एका दिशेने जात होती. याच वेळी समोरून येणारे वाहन अचानक तितक्याच वेगात ९० अंशात वळले आणि माझ्या गाडीसमोर आले. माझी गाडी जाऊन त्या वाहनावर आदळली. त्या वाहनचालकाला विचारले असता तो म्हणाला, ‘मी गाडी वळवली नाही, ती आपणहून वळली. आपण मोबाइलवर बोलत होतो.
अचानक मोबाइल हातातून सुटून गाडीत खाली पडला आणि तो उचलायला गेलो तर हात अडकला. हात काढत असताना हिसका बसला आणि दुसऱ्या हाताने पकडलेली स्टिअरिंग अचानक वळल्याने गाडीला अपघात झाला', अशी आठवण या वेळी रावते यांनी बाेलताना सांगितली.
रस्ता सुरक्षिततेसंदर्भात खूप कडक धोरणे अवलंबण्यात आली असून त्यात मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवणे, सिग्नल ओलांडून पुढे जाणे, मालवाहू वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणे, दारू किंवा अमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालवणे तसेच वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणे या गुन्ह्यांसाठी पूर्वी चालकांना फक्त दंड भरावा लागायचा. आता त्यांचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाईल. शिवाय मद्यपान करून अमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालवणाऱ्या व्यक्तीच्या पहिल्या गुन्ह्यासाठी आम्ही न्यायालयाकडे कैदेची मागणी करणार आहोत, अशी माहिती रावतेंनी दिली.
रस्ता सुरक्षेविषयी केवळ दोन दिवस घेतलेल्या धडक मोहिमेचे मोठे परिणाम दिसून आल्याचेही रावते म्हणाले. ६०४ वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्यात आले. मालवाहू वाहनांतून क्षमतेपेक्षा जास्त भाराचा माल वाहून नेणाऱ्या १४४, प्रवासी वाहनातून मालवाहतूक करणाऱ्या ३, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या १०७, वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणाऱ्या ५९, सीटबेल्ट न वापरणाऱ्या ११६, वाहन चालवताना हेल्मेट न वापरणाऱ्या ४५७, वाहन अति वेगाने चालवणाऱ्या ३ व सिग्नल तोडणाऱ्या २७४ वाहनचालकांवर मुंबई िवभागात कारवाई करण्यात आली. दोन दिवसांत एकूण ९ लाख ५४ हजार ७२० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो...