आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tribute For Kalam Making Powerful India Chief Minister Devendra Fadnavis

बलशाली भारत हीच कलामांना श्रद्धांजली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत भावना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी राष्ट्रपती डाॅ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या निधनामुळे सात दिवस देशभर राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात अाला अाहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी राज्य विधान भवनावरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात अाला हाेता. - Divya Marathi
माजी राष्ट्रपती डाॅ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या निधनामुळे सात दिवस देशभर राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात अाला अाहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी राज्य विधान भवनावरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात अाला हाेता.
मुंबई - ‘युवाशक्तीची जाणीव करून देणारे तसेच देशाला प्रेरित करणारे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम हे बदल आणि परिवर्तनाचे प्रणेते होते. त्यांनी दाखवलेल्या मार्गाने केलेली बलशाली भारताची वाटचाल हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल’, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत आदरांजली वाहिली. डाॅ. कलाम, माजी राज्यपाल रा. सू. गवई यांच्या निधनाबद्दल शाेक व्यक्त करणारा प्रस्ताव विधानसभेत संमत करण्यात आला.
भारतमातेचा सच्चा सुपुत्र असलेल्या कलामांनी देशाच्या जडणघडणीत अतुलनीय योगदान दिले होते, असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, अग्नी क्षेपणास्त्राची निर्मिती, पोखरण अणुचाचणीतील सहभाग, वैज्ञानिक सल्लागार ते सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपतिपदापर्यंतची त्यांची वाटचाल अभिमानास्पद होती. त्यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या भारतरत्न पुरस्काराने तर गौरवण्यात आले होतेच, शिवाय देशविदेशातील तीस विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट पदवी देऊ केली होती. नितळ मनाचा आणि प्रखर राष्ट्रभक्तीचा साक्षात्कार करून देणा-या डॉ. कलाम यांच्या अग्निपंख या पुस्तकामधील मातापित्याला समर्पित केलेले उतारेही त्यांनी वाचून दाखवले.

समता, सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा पुरस्कार करत सामाजिक सलोख्यावर भर देणा-या रा. सू. गवईंच्या कर्तृत्वाचा गौरव करत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वंचितांचे शिक्षण, पाली भाषा प्रचार आणि नागपूरमधील दीक्षाभूमीतील योगदानाबद्दल सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या शोकप्रस्तावाला पाठिंबा देत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही डॉ. कलाम यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला. आपल्या 'पुरा' या संकल्पनेतून ग्रामीण आणि शहरी भागातील दरी कमी करण्याच्या डॉ. कलाम यांच्या प्रयत्नांचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. गवई आणि डॉ. कलामांसारखी व्यक्तिमत्त्वे जाण्याने एक सामाजिक पोकळी निर्माण झाल्याचे विखे पाटील म्हणाले.

याशिवाय शेकापचे ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे आणि आमदार वीरेंद्र जगताप यांनीही डाॅ. कलाम व गवई यांच्या कार्यावर प्रकाश टाकत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही डॉ. कलाम आणि रा. सू. गवईंच्या कार्याचा गौरव करत या दोघांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाल्याचे सांगितले.

पुढे वाचा, नेहरूंनंतर मुलांचे लाडके कलाम चाचा