आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'भारत माता की जय' चा माहिम दर्ग्यात जयघोष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - "भारत माता की जय' म्हणायचे की नाही यावर सध्या देशासह राज्यात वादंग निर्माण झाले .असताना गुरुवारी माहिम येथील पीर मकदूम शाह बाबाच्या दर्ग्यात तिरंगा झेंडा डौलाने फडकवत "भारत माता की जय' चा जयघोष करण्यात आला. या वेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.

दर्ग्याचे ट्रस्टी सोहेल खंडवाणी म्हणाले, पीर मकदूम शाह बाबा यांच्या दर्ग्याचे नाव सर्वदूर प्रसिद्ध आहे. गुरुवारी दर्ग्याचा ६०३ वा उरूस भरवण्यात आला होता. या वेळी दर्ग्यात तिरंगा झेंडा फडकवण्यात आला. तसेच उपस्थित मुस्लिम बांधवांनी "भारत माता की जय' चा जयघोष करत चैतन्य फुलवले. देशात सध्या इसिस संघटनेचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या संघटनेत सहभागी होण्यासाठी अनेक मुस्लिम तरुण आकर्षित होत आहेत. यासाठी बाबांच्या शांती, क्षमा आणि प्रेमाचा संदेश देशभर पोहोचवण्याची गरज आहे. शिवसेना नेते हाजी अरफात शेख म्हणाले, दर्ग्यात ज्यावेळी तिरंगा झेंडा फडकवण्यात आला त्यावेळी पोलिस बँडचा निनाद करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यामातून मुस्लिम बांधवांनी असदुद्दीन ओवसी आणि देशद्रोही नेत्यांना चपराक लगावली आहे. राज्यात भीषण दुष्काळाची पार्श्वभूमी पाहता दर्ग्याकडून एक गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
दर्ग्याकडून अॅपचा वापर
आयसिसचा धोका अगदी आपल्या घरात पोहोचला आहे. आपले तरुण अशा धोक्यापासून दूर राहण्याच्या दृष्टीने आम्ही ‘माहिम दर्गा’ हे अॅप सुरू करत असल्याची माहिती खंडवानी यांनी दिली. ते म्हणाले, आयसिस इंटरनेटच्या माध्यमातून भारतातील तरुणांना इस्लामचा चुकीचा अर्थ सांगत आहे. हे थोपवण्यासाठी आम्ही माहिती तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. या अॅपच्या माध्यमातून इस्लाम, त्याचा अर्थ, बातम्या, शंकांचे निरसन व निरूपण इस्लाम धर्माच्या अभ्यासकांकडून देणार आहोत. त्याचबरोबर फेसबुक, ट्विटर, यूट्यूब अशा सोशल मीडियाचाही वापर करणार आहोत. यामुळे जनजागृती करण्यात येईल, असेही ते म्हणाले.