आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तिहेरी बॉम्बस्फोटातील अाराेपी साकीब नाचणची अखेर सुटका; शिक्षेत सूट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईतील विलेपार्ले, मुंबई सेंट्रल आणि मुलुंड येथे २००२ आणि २००३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा प्रमुख सूत्रधार असलेला दहशतवादी साकीब नाचण याची बुधवारी सकाळी ठाणे मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली. दोषी ठरल्यानंतर एक वर्षे आठ महिने इतका काळ त्याने तुरुंगात व्यतीत केला, तर तुरुंगातील चांगल्या वर्तणुकीमुळे नाचणला शिक्षेतून पाच महिने तेरा दिवसांची सूट मिळाल्याने त्याची तुरुंगातून लवकर सुटका झाली. 

 

मुंबईत झालेल्या या तिन्ही बॉम्बस्फोटांचा साकीब नाचण हाच प्रमुख सूत्रधार असल्याचा दावा करत मुंबई पोलिस आणि सरकारी पक्षाने सुनावणीदरम्यान जन्मठेपेच्या शिक्षेची मागणी केली होती. मात्र हत्यारे आणि स्फोटके बाळगल्याप्रकरणी दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत दोषी मानत न्यायालयाने त्याला दहा वर्षांची शिक्षा सुनावली होती. हत्येच्या प्रयत्नांचा आणखीन एक गुन्हा दाखल असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मार्च २०१६ मध्ये न्यायालयाने दोषी ठरवण्यापूर्वी त्याने बराच काळ कच्चा कैदी म्हणून न्यायालयीन कोठडीत काढला होता. ‘सिमी’ या बंदी असलेल्या संघटनेचे सरचिटणीस म्हणूनही त्याने काही काळ काम पाहिले होते. नाचणसारख्या उच्चशिक्षित कायद्याच्या विरोधात दहशतवादी हल्ल्याचा गुन्हा दाखल झाल्याने या खटल्याकडे सर्वांचेच लक्ष होते.  


बाबरी, गाेध्राचा सूड म्हणून केले बाॅम्बस्फाेट  
नाचण व त्याच्या साथीदारांनी गोध्रा हत्याकांड आणि बाबरी मशीद पाडल्याचा सूड म्हणून २७ जानेवारी २००३ राेजी सीएसटीहून कर्जतकडे जाणाऱ्या लोकल तसेच विलेपार्ले मार्केटमध्ये झालेले बाॅम्बस्फोट आणि ६ डिसेंबर २००२ रोजी मुंबई सेंट्रल रेल्वेच्या इमारतीतील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंटमध्ये एकूण तीन बाॅम्बस्फोट केले होते.  या बॉम्बस्फोटांत १२ जण ठार आणि १४१ जण जखमी झाले होते. या खटल्यातील एकूण १३ आरोपींपैकी १० आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले होते. त्यापैकी मुज्जमील अन्सारी या आरोपीला फाशीची शिक्षा आणि उर्वरित आरोपींना जास्तीत जास्त जन्मठेप ते कमीत कमी सहा वर्षे शिक्षेची मागणी सरकारी वकील रोहिणी सालियन यांनी न्यायालयात केली होती. १३ वर्षांपेक्षा जास्त काळ सुरू असलेल्या या खटल्यात नाचणसह आतीफ मुल्ला, हसीब मुल्ला, गुलाम अकबर खोटल, मोहंमद जमील शेख, फरहान मलिक खोत, नूर मोहंमद अन्सारी, डाॅक्टर वाहिद अन्सारी, अन्वर अली खान आणि मुज्जमील अन्सारी या १० जणांना दोषी ठरवण्यात आले होते. तर नदीम पाबोला, हारुण लोहार आणि अंदनान मुल्ला या तिघांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या भिवंडील पडघा भागातील बोरिवली येथे बाॅम्बस्फोटाचा कट रचला गेला होता.

बातम्या आणखी आहेत...