आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सतर्कता: बेवारस मोबाईल आढळल्यामुळे मुंबईत विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आज सकळी मुंबईहून इस्तंबुलकडे उड्डाण केलेल्या विमानाचे मुंबईत एमर्जन्सी लॅंडिंग करावे लागले. विमानात बेवारस व संशयास्पद मोबाईल आढळून आल्यामुळे कर्मचा-यांनी हे विमान तत्काळ माघारी फिरवण्याचा निर्णय घेतला. सुरक्षा यंत्रणांनी मोबाईल ताब्यात घेतला असून, संपूर्ण विमानाची कसून तपासणी करण्यात आली. त्यानंतर चार तासाने विमानाने इस्तंबुलकडे पुन्हा उड्डाण केले.
याबाबत मिळालेली माहिती अशी, तुर्की एअरलाईन्सच्या विमानाने आज सकाळी नियोजित वेळेप्रमाणे साडेसहा वाजता इस्तंबुलकडे जाण्यासाठी उड्डाण केले. मात्र, उड्डाण करताच विमानात एक बेवारस व संशयास्पद मोबाईल आढळून आला. विमानातील एअरलाईन कर्मचा-यांनी विमानातील प्रवाशांना कोणाचा मोबाईल हरवला आहे का अशी विचारणा केली. मात्र, सर्व प्रवाशांनी संबंधित मोबाईल आपला नसल्याचे सांगितले. त्यामुळे घातपाताच्या शक्यतेने पायलटने लागलीच विमानाचे मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लॅंडिंग केले.
सध्या देशभर हायअलर्ट देण्यात आला आहे. पंजाबमधील पठाणकोटमध्ये गेली 60 तासांहून अधिक दहशतवाद्यांशी भारतीय जवानांची धुमचक्री सुरु आहेत. आतापर्यंत 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले असले तरी भारताचे 7 जवान ठार झाले आहेत. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे सुरक्षेत कोणतेही कसूर राहू नये यासाठी सर्वत्र सतर्कता बाळगली जात आहे. त्यामुळेच विमान तातडीने खाली उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई विमानतळावर विमान खाली आल्यानंतर विमानाची कसून तपासणी करण्यात आली. मात्र, त्यात काहीही संशयास्पद बाबी आढळून आल्या नाहीत. त्यामुळे संपूर्ण तपासणीनंतर साडे आकरा वाजता विमानाचे पुन्हा उड्डाण करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...