मुंबई- छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शोचा स्पर्धक आणि अभिनेता यश पंडितला एका सहकारी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. लग्नाचे अमिष दाखवून संबंधित अभिनेत्रीवर तीन महिने बलात्कार केल्याचा आरोप यशवर ठेवण्यात आला आहे.
याबाबतची माहिती अशी की, तीन महिन्यापूर्वी एका मालिकेच्या सेटवर यश आणि पीडित अभिनेत्रीची भेट झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री व पुढे प्रेमसंबंध जुळले होते. यश पंडितने संबंधित अभिनेत्रीला लग्नाचे अमिष दाखवून त्याच्या जुहूतल्या राहत्या घरी बोलावून वारंवार बलात्कार केल्याचा आरोप अभिनेत्रीने पोलिसात केलेल्या तक्रारीत केला आहे.
यशने संबंधित अभिनेत्रीची नुकतीच आपल्या पालकांशी ओळख करण्यासाठी घरी बोलावले. मात्र त्यानंतर तो मला टाळू लागल्याचा दावा अभिनेत्रीने केला आहे. यश आता माझे फोनही घेत नसल्यामुळे जुहू पोलिसात धाव घेत संबंधित अभिनेत्रीने यश पंडितविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
आपल्याशी केवळ शारीरिक संबंध ठेवण्याचा यश पंडितचा इरादा होता. इतरही काही मुलींसोबत त्याचे संबंध असल्याचे त्याने मला सांगितले आहे. बाकीच्या मुलींनी इज्जतीसाठी पोलिसांत धाव घेतली नसेल मात्र मी यश पंडितला धडा शिकवणार आहे, असे या अभिनेत्रीने म्हटले आहे.
यश पंडित एमटीव्हीवरील स्प्लिट्सविला 8 या गाजलेल्या रिअॅलिटी शोचा स्पर्धक राहिला आहे. तसेच बालपणी ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटात मंदाकिनीचा मुलगा म्हणून दिसला होता. याशिवाय ये क्या हो रहा है, रोक सको तो रोक लो, फालतू यासारखे दुय्यम दर्जाचे चित्रपटही त्याने केले आहेत. क्योंकि सास भी कभी बहु थी, घर की लक्ष्मी बेटीया, तेरे मेरे सपने, सावित्री यासारख्या काही मालिकांतही त्याने काम केले आहे.