आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीस वर्षांपूर्वी काँग्रेस फाेडणाऱ्या शिवसेनेला पक्षफुटीची भीती, महापौरपद हवेच!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई महापालिकेत शिवसेना क्रमांक एकचा पक्ष ठरला असला तरी बहुमतापासून दूर आहे. भाजपशी युती न केल्यास पक्ष फुटण्याचीही शिवसेनेला भीती अाहे. वीस वर्षांपूर्वी सन १९९६-९७ मध्ये मुंबई महापालिकेत काँग्रेसचे बहुमत असतानाही शिवसेनेने या पक्षाचे सुमारे २५ नगरसेवक फोडून आपला महापौर बसवला होता. यासाठी ज्येष्ठ नेते मनोहर जोशी आणि भारतीय विद्यार्थी सेनेचे तत्कालीन प्रमुख राज ठाकरे यांनी पडद्यामागून सूत्रे हलवली होती.  

त्यानंतर आजतागायत मुंबईत शिवसेनेचाच महापाैर अाहे. मात्र, अाता जर भाजपसाेबत युती केली नाही किंवा अापला महापाैर झाला नाही तर त्या वेळच्या काँग्रेसप्रमाणे अाता अापलाही पक्ष फुटू शकताे, अशी भीती शिवसेनेच्या गाेटातून व्यक्त हाेत अाहे. त्यामुळे भाजपशी हातमिळवणीसाठी पक्षातील काही नेते अाग्रही अाहेत. दरम्यान, या घडामाेडींच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनोहर जोशी आणि लीलाधर डाके यांच्याशी  चर्चा केल्याचे समजते.   
 
काय झालेे हाेते वीस वर्षापूर्वी?  
१९९६ मध्ये मुंबईत काँग्रेसचे ११२ आणि शिवसेनेचे ६९ नगरसेवक होते. एकतृतीयांश नगरसेवक फोडले तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार संबंधित पक्ष नगरसेवकांवर कारवाई करू शकत नाही. त्याअाधारे तेव्हा शिवसेनेने काँग्रेसचे २५ नगरसेवक फोडून त्यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. याकामी काँग्रेस नेते मुरली देवरा आणि गुरुदास कामत यांनीही मदत केली होती.  काँग्रेस अल्पमतात आल्यानंतर शिवसेनेने मिलिंद वैद्य यांना महापौर केले. त्यामुळे काँग्रेस आता शिवसेनेला मदत करण्याऐवजी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचाही विचार करू शकते, अशी शक्यताही वर्तवली जात अाहे.  

शिवसेनेकडून भाजपचे ‘कल्याण’
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत एकमेकांची उणीदुणी काढल्यानंतरही शिवसेना-भाजपने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली होती. मुंबई मनपाच्या निवडणुकीत पुन्हा दाेन्ही पक्षांत ताणाताणी झाल्यानंतर अाता मनसेच्या मदतीने कल्याण-डाेंबिवली मनपात भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असेल, असेही संकेत दिले जात हाेते. परंतु मंगळवारी कल्याण मनपात झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे भाजपचा एक वाढीव उमेदवार निवडून आला आणि मनसेला हार पत्करावी लागली. याच ‘पॅटर्न’चा अाधार घेऊन मुंबई मनपासाठीही शिवसेना-भाजपचे मनोमिलन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जास्त न ताणता युती करण्यास तयार असल्याचा संदेश ‘मातोश्री’वर पाठवल्याचे समजते.  

कल्याण-डोंबिवली परिवहन समितीसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे तीन आणि भाजपचे तीन उमेदवार निवडून आले. भाजपचा तिसरा उमेदवार निवडून येण्यासाठी शिवसेनेच्या काही मतांची आवश्यकता होती आणि शिवसेनेने ती गरज पूर्ण केल्यानेच भाजपचा तिसरा उमेदवारही निवडून अाणला. असेच राजकारण मुंबईतही होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.   
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत महापौर आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा दावा न करण्याचा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला असून तसा निरोप ‘मातोश्री’वर पोहोचवला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही त्यासाठी सकारात्मकता दाखवली आहे. काँग्रेस, मनसेसह अन्य पक्षांची मदत घेऊन शिवसेनेने सत्ता स्थापन केली तर सत्तेत सहभागी झालेल्या सर्व पक्षांना सत्तेत वाटा द्यावा लागेल. मात्र भाजपशी युती केल्यास सत्तेतील जास्तीत जास्त वाटा शिवसेनेकडेच राहणार असल्याने भाजपशीच युती करावी, असे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे.   

शिवसेनेशी युतीची मनसेला अाशा
माझे कूळ अन‌् मूळ शिवसेना असल्याने मुंबईत शिवसेनेचा महापौर झाल्यास आनंदच होईल. पण सध्य मुंबईत मनसे आणि शिवसेना यांच्या युतीची शक्यताही वाढली आहे, असे मत मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले. ईव्हीएम यंत्रात घोटाळे झाल्याच्या तक्रारी वाढल्या असतील तर त्याची चौकशी व्हावी. मात्र मतदारांनी पंचायत ते पार्लमेंट एकच सरकार असावे, या भूमिकेतून मतदान केल्यामुळे भाजपला राज्यभरात चांगले यश मिळाले, अशीही कबुली नांदगावकर यांनी बुधवारी दिली.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...