आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संशयाचा ‘फुगा’ फुटला; विमानतळावर शाेभेचे फुगे, दाेन जणांना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई विमानतळावरील हवाई उड्डाण क्षेत्रात शनिवारी संध्याकाळी दिसलेल्या पाच मानवरहित पॅराशूटचे गूढ उकलले अाहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. एका खासगी विमान कंपनीच्या वैमानिकाला शनिवारी उड्डाणापूर्वी रनवेच्या वरच्या हवाई उड्डाणमार्गात दिसलेले ही पाच पॅराशूट्स म्हणजे प्रत्यक्षात हेलियमच्या फुग्यांचे गुच्छ असल्याची बाब उघड झाल्याने पोलिस तसेच सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

मुंबई विमानतळाच्या टर्मिनल २ च्या धावपट्टीच्या हवाई मार्गात शनिवारी संध्याकाळी पाच छोट्या आकाराच्या पॅराशूट्ससदृश वस्तू या पॅराशूट्स नसून ते हेलियमने भरलेले फुग्यांचे गुच्छ असल्याची बाब तपासाअंती उघड झाली आहे. मुंबईतील धर्मानंद डायमंड एक्स्पोर्ट््स या कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे क्रिकेट सामने शनिवारी विमानतळाला लागून असलेल्या एअर इंडियाच्या मैदानावर आयोजित करण्यात आले होते. या सामन्यांना सुरुवात होण्यापूर्वी आयोजकांनी डायमंड कंपनीचे लोगो असलेले हेलियमचे फुगे हवेत सोडले. हे मैदान विमानतळाच्या अगदी जवळ असल्याने वेगवान हवेने हे फुगे विमानांच्या उड्डाणमार्गात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. संवेदनशील भागात विनापरवानगी फुगे सोडल्याबद्दल तसेच लोकांच्या जिवाला धोका उत्पन्न होईल असे वर्तन केल्याबद्दल दाेघांविराेधात गुन्हे दाखल करण्यात अाले अाहेत.

परवानगी घेतली नाही
विमानतळ परिसरात फुगे सोडण्यापूर्वी पोलिसांची आणि संबंधित यंत्रणांची परवानगी अावश्यक असतानाही ती न घेता अशा पद्धतीने फुगे सोडल्यामुळे निष्काळजी वर्तन केल्याप्रकरणी मुंबई विमानतळ पोलिस ठाण्यात आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या एका छोट्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. कुणाल शहा आणि नीलेश श्रीमनकर अशी त्यांची नावे अाहेत.