आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नतद्रष्टपणा; मृत्यूशी झुंज देत असताना प्रमोशनची फाइल हलली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- काळबादेवी आग दुघर्टनेत ८० टक्के भाजलेले मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असताना पालिकेला त्यांच्या रखडलेल्या पदोन्नतीची आठवण झाली अाहे. गेले पाच महिने बासनात गुंडाळून ठेवलेला पदोन्नतीचा प्रस्ताव घाईगडबडीत मंजूर करण्याचा प्रयत्न सत्ताधारी शिवसेना-भाजपने चालवला असून सत्ताधाऱ्यांच्या या कृतीवर जोरदार टीका होत आहे.
शनिवारी काळबादेवी परिसरातील गोकुळ या चारमजली इमारतीस भीषण आग लागून मुंबई अग्निशमन दलाच्या दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू ओढवला असून दोन अधिकारी सध्या ऐरोलीच्या बर्न हाॅस्पिटलमध्ये मरणाशी झुंज देत आहेत.
अग्निशमन दलाचे उपप्रमुख सुधीर अमीन तब्बल ८० टक्के भाजले आहेत. अमीन हे अग्निशमन दलातील अत्यंत धाडसी अधिकारी म्हणून अाेळखले जातात. मूळचे कर्नाटकातील असलेल्या अमीन यांचा रोप रेस्क्यूमध्ये जबरदस्त हातखंडा अाहे. मुंबईवरील २६/११ हल्ल्यावेळी ताज हाॅटेलच्या सहाव्या मजल्यावरील अनेकांची त्यांनी जीव धोक्यात घालून सुटका केली होती. त्या धाडसी कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपती पदक देऊन गौरवण्यात आले हाेते. अनेकांचा जीव वाचवणाऱ्या या अधिकाऱ्याच्या पदोन्नतीचा प्रस्ताव पालिकेच्या विधी विभागाने सभागृहास जानेवारीमध्ये पाठवला होता. मात्र त्याच्यावर सत्ताधारी शिवसेना-भाजपने गेल्या पाच महिन्यात कोणताही निर्णय घेतला नाही. ८० टक्के भाजल्याने अमीन यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे पदोन्नतीचे हे प्रकरण शेकण्याची सत्ताधाऱ्यांना धास्ती वाटू लागली आहे.

पालिकेच्या सभेत मांडला प्रस्ताव
काळबादेवीदुर्घटनेबाबत सोमवारी पालिका सभागृहाची विशेष बैठक पार पडली. त्यामध्ये अमीन यांचा पदोन्नतीचा प्रस्ताव सादर करण्यात आला. अचानक आलेल्या पदोन्नतीचा प्रस्ताव पाहून विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने सत्ताधरी सेना-भाजपवर जोरदार शरसंधान साधले. अमीन यांच्या पदोन्नतीची पालिकेने जी चेष्टा केली त्यामुळे मुंबई महापालिकेच्या ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.