आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवगिरीचे ‘गड'करी तावडे की मुनगंटीवार, दोन मंत्र्यांत बंगल्यावरून वाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील नव्या सरकारच्या शपथविधीस तब्बल दीड महिना उलटून गेला आहे. मात्र, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पंधरा वर्षे मुक्काम असलेल्या ‘देवगिरी’ बंगल्यावर भाजपचेच दोन मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि विनोद तावडे यांनी हक्क सांगितल्यामुळे हा बंगला कुणाला द्यायचा, असा पेच निर्माण झाला आहे. चार बैठका होऊनही त्याचा तिढा सुटत नसल्याने शिक्षणमंत्री विनोद तावडे अजूनही परिषदेचे विरोधी पक्षनेते असताना मिळालेल्या बंगल्यात तर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवर वरळीच्या शुभदा-सुखदा इमारतीत निवासाला आहेत.

फडणवीस सरकारचा मुळातच शपथविधी विलंबाने झाला. त्यानंतर खातेवाटपाचा घोळ निर्माण झाला. खातेवाटप होताच बंगल्याच्या वाटपाचा तिढा उभा राहिला. त्यातील रामटेक या उपमुख्यमंत्र्यांसाठी असलेल्या बंगल्यावर पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी दावा सांगितला होता. अखेर ज्येष्ठतेनुसार रामटेक बंगला खडसे यांना मिळाला.

शिवसेनेच्या मंत्र्यांनाही बंगल्याचे वाटप विनासायास पार पडले; पण भाजपच्या दोन मंत्र्यांनी एका बंगल्यावरून इभ्रतीचा प्रश्न निर्माण केला आहे. त्या बंगल्याचे नाव आहे ‘देवगिरी’. मलबार हिल परिसरातील नारायण दाभोलकर मार्गावर हा सुंदर, प्रशस्त बंगला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सलग १५ वर्षे या बंगल्यात मुक्काम होता.

उपमुख्यमंत्री बनल्यावर अजित पवार यांना रामटेक बंगला मिळणे अपेक्षित होते; परंतु राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी तो सोडण्यास नकार दिला. भुजबळ यांचे मंत्रिपद गेले, तरी त्यांचा मुक्काम रामटेकवरून हलला नाही. त्यामुळे नाइलाजानेच अजित पवार यांनी देवगिरी आपले ठाणे केले राष्ट्रवादीची सर्व सूत्रे येथूनच हलत असत. या बंगल्याच्या अंतर्गत रचनेत बदल करण्यासाठी अजित पवार यांनी तब्बल ३७ लाख ८० हजार रुपये खर्च केले होते. माहिती अधिकारात बिंग फुटताच पवार यांनी त्यातील २७ लाख शासनाला जमा केले. मुंबईत बांधकाम खात्याकडे जी काही शासकीय निवासस्थाने आहेत, त्यातील रामटेक, देवगिरी, चित्रकूट आणि पर्णकुटी या बंगल्यांसाठी मंत्र्यांमध्ये स्पर्धा असते.

हक्क कुणाचा?
मंत्र्यांना बंगल्याचे वाटप मुख्यमंत्री करतात. ज्येष्ठतेनुसार बंगल्याचे वाटप होते. विनोद तावडे या वेळी पहिल्यांदा मंत्री बनलेत, तर सुधीर मुनगंटीवार युती सरकारच्या काळातही मंत्री होते. त्यामुळे ज्येष्ठतेनुसार मुनगंटीवार यांचा दावा योग्य समजला जातो. चार बैठका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार वेळा बंगले वाटपासाठी बैठक घेतली. त्यामध्ये २८ मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप झाले. मात्र, विनोद तावडे आणि सुधीर मुनगंटीवार यांना अद्याप बंगल्याचे वाटप होऊ शकलेले नाही.

रीतसर पत्र
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिपद मिळताच देवगिरी बंगला आपल्याला मिळावा, असे रीतसर पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले होते.

दोन बंगले-दोन मंत्री
सार्वजनिक बांधकाम खात्याकडील महत्त्वाच्या सर्व बंगल्यांचे वाटप झालेले आहे. देवगिरी आणि सेवासदन याच बंगल्याचे वाटप बाकी आहे. त्यामुळे देवगिरीवर तोरण कुणाचे आणि सेवासदनात कुणाला जावे लागणार, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. आजपर्यंत बाळासाहेब थोरात हे सेवासदन या बंगल्यावर राहत होते.