आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इमारतीची अाग विझविताना मुंबईत दोन अधिका-यांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दक्षिण मुंबईतील काळबादेवी भागात जुन्या हनुमान गल्लीतील ३३ गोकुळ निवास इमारतीच्या आगीत जखमी झालेल्या अग्निशमन दलाच्या दोन अधिका-यांचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. संजय राणे व महेंद्र देसाई अशी या अधिका-यांची नावे आहेत, तर मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर व उपमुख्य अधिकारी सुधीर अमीन यांच्यासह १० जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी सायंकाळी आग लागल्यानंतर ती काबूत आणण्याचे प्रयत्न सुरू असताना रात्री इमारतीचा काही भाग कोसळून त्याखाली राणे व देसाई गाडले गेले होते. मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
मध्यरात्रीच्या सुमारास या दोन्ही अधिका-यांना ढिगा-याखालून बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे.
शर्मिला व अमित ठाकरे पीडित कुटुंबीयांच्या भेटीला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला आणि पुत्र अमित यांनी अग्निशमन दलाच्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांची रविवारी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
अग्निशमन दलाच्या दोन जवानांचा बळी घेणा-या काळबादेवी येथील भीषण आगीची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना रविवारी दिले. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचेही आश्वासनही त्यांनी दिले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मनपा आयुक्तांनी तातडीने बैठक घेऊन तीन आठवड्यात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधितांना दिले.