आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डहाणूवर शाेककळा : दहशतवादविराेधी घाेषणा देत दाेन यात्रेकरूंना अखेरचा निराेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत्यू झालेल्या निर्मला ठाकुर आणि उषा सोनकर. - Divya Marathi
मृत्यू झालेल्या निर्मला ठाकुर आणि उषा सोनकर.
मुंबई  - काश्मिरातील अनतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंवर सोमवारी रात्री झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या डहाणूच्या दोन महिला यात्रेकरूंवर मंगळवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. निर्मला ठाकूर आणि उषा सोनकर अशी या दोन मृतांची नावे असून डहाणूतील आणखी सहा जणांचा या दुर्घटनेतील जखमींमध्ये समावेश आहे. दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे प्रत्येकी दहा लाखांची मदत पालकमंत्री विष्णू सवरा यांनी जाहीर केली.  
 
अनंतनाग येथील हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणूतील दोन महिलांचा समावेश आहे. या मृतांमधील निर्मला ठाकूर या डहाणूतील आशागड येथील तर उषा सोनकर या डहाणू स्टेशन परिसरात वास्तव्यास होत्या. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. त्यानंतर मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास या दोन्ही महिलांचे मृतदेह दिल्लीहून विशेष विमानाने सुरतला आणण्यात आले. तिथे त्यांचे शवविच्छेदन केल्यानंतर संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास डहाणूच्या  हेलिपॅडवर दोन्ही मृतदेह विशेष हेलिकाॅप्टरने आणण्यात आले. शवपेट्यांचा आकार मोठा असल्याने त्या हेलिकाॅप्टरमध्ये ठेवण्यात काहीअंशी अडचण निर्माण झाल्याने मृतदेह पोहोचण्यास विलंब झाल्याचा माहिती स्थानिक प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. 
 
दोन्ही मृतदेह अंत्यदर्शनासाठी काही काळ पार्सल हाॅलच्या प्रांगणात ठेवण्यात आले होते. त्यानंतर ‘आतंकवादी मुर्दाबाद’ च्या घोषणा देत डहाणूवासीयांनी या दोघींना अखेरचा निरोप दिला. पालकमंत्री विष्णू सवरा, आमदार पास्कल धणारे, आमदार मनीषा चौधरी, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे, पोलिस अधीक्षक मंजुनाथ सिंगे हे सर्व जण या वेळी उपस्थित होते.  
 
महाराष्ट्रातील अकरा भाविक जखमी
या हल्ल्यातील जखमींमध्ये महाराष्ट्रातील ११ जणांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते.  यामध्ये यशवंत डोंगरे आणि योगिता डोंगरे या दांपत्यासह प्रकाश वजानी, भाग्यमणी ठाकूर, पुष्पा गोसावी आणि गीता रावळ अशा डहाणूतील सहा जणांचा समावेश आहे. सध्या त्यांच्यावर जम्मूमध्ये उपचार सुरू असल्याचे समजते. हल्ला झालेल्या गाडीत डहाणूमधील एकूण दोन पुरुष आणि पंधरा महिला अशा एकूण सतरा जणांचा समावेश होता.  हे सर्व जण पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील कासा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती अाहे.
 
दु:ख विसरून गोसावी यांनी बजावले कर्तव्य  
सोमवारच्या हल्ल्यात डहाणू येथील एक रुग्णवाहिका चालक दिनेश गोसावी यांच्या पत्नी पुष्पा गोसावीदेखील जखमी झाल्या आहेत. त्यांच्या पाठीत गोळी लागली असून त्यांच्यावर जम्मू येथे उपचार सुरू आहेत. अशा परिस्थितीतही दिनेश गोसावी यांनी निर्मला ठाकूर यांचा मृतदेह आपल्या रुग्णवाहिकेतून अंत्यसंस्कारासाठी आणला. गोसावींनी दाखवलेल्या या कर्तव्यतत्परतेची चर्चा अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थितांमध्ये होती.
बातम्या आणखी आहेत...